Sharad Pawar Reaction Over Mukhyamantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यभरात चर्चा सुरू आहे. या योजनेची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून यात नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यावर १५०० रुपये देण्यात येतात. तसेच या योजनेतून १ कोटी ५९ लाख महिलांच्या खात्यात दोन महिन्यांची रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे. या योजनेत नोंदणी करणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे, या योजनेवरून महाविकास आघाडीतील नेते महायुती सरकार टीका करत असून, दुसरीकडे महाविकास आघाडीचे सरकार आल्यास याच योजनेची रक्कम दुप्पट करण्याचे शब्द विरोधकांकडून दिले जात आहेत. याबाबत आता शरद पवार यांनी सूचक विधान केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन टर्म झाल्या, आता तिसरी टर्म सुरु आहे, इथे येऊन या योजनेचे कौतुक करुन गेले, त्या काळात त्यांना बहिणींच्या व्यथा अन् दु:ख दिसले नाही का, उद्धव ठाकरेंच्या सरकारचा काळ सोडता इथे त्यांची सत्ता आहे, त्या काळात बहिणींचे दु:ख दिसले नाही का, असे एकामागून थेट सवाल शरद पवार यांनी केले आहे.
राज्यातील महिलांना सुरक्षा देणे गरजेचे आहे
राज्यातील महिलांना सुरक्षा देणे गरजेचे आहे. दररोजचे वर्तमान पत्र पाहिले, तर महिलांवर अत्याचार ही बातमी नित्याची झालेली आहे. ती क्लेशदायक आहे. खऱ्या अर्थाने बहिणींना सुरक्षेची सन्मानाची गरज आहे. पैसे देऊन टीव्हीवर आणि वर्तमानपत्रात जाहिरात देऊन तुम्ही त्यांच्याबद्दलची आस्था दाखवत नाही, महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत, वाढलेले आहेत, असा दावा शरद पवारांनी केला.
राज्यातील बहिणी बेरोजगारी, महागाईचा विचार करतील
लाडकी बहीण योजनेचे पैसे एक कोटी आणि अधिक महिलांना वाटल्याचे म्हणतात. अजून दोन हप्ते देतील. लाडकी बहीण योजनेचा परिणाम थोडासा होईल, फार काही होणार नाही. समाजात, लोकांच्यात, बहिणींच्या घरात बेकारीचा प्रश्न आहे, महागाई, महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न आहे. विकासाबाबत भरीव कामगिरी आहे, असे काही दिसत नाही. राज्यातील बहिणी बेरोजगारी, महागाईचा विचार करतील. गावागावात जातो, मेळावा घेतो, बहिणींशी संवाद करतो, त्या अनेक प्रश्न प्रकर्षाने मांडतात, लाडकी बहीण योजनेचा फार परिणाम जाणवणार नाही, पैशांचा परिणाम थोडाफार होईल पण त्यांचे राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती नाही, असे शरद पवार म्हणाले. ते एका मुलाखतीत बोलत होते.