लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात सर्वच पक्षांकडून जबरदस्त प्रचार सुरू आहे. मात्र, सर्वांचे लक्ष आहे ते बारामती लोकसभा निवडणुकीकडे. येथे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार असा सामना रंगला आहे. यातच, शरद पवार यांनी लोकमतसाठी लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांना विशेष मुलाखत दिली. यात "सुप्रिया ही बाहेरचे असण्याचे काही कारण नाही. तिचं गाव, तिचं घर, तिची शेती, सर्व बारामतीला आहे," असे शरद पवार यांनी म्हटले आहे.सुप्रिया सुळे या नावानेच ती लोकांच्या समोर -सुप्रिया पवार सुळे, या ऐवजी सुप्रिया सुळे असे म्हणून त्यांनी स्वतःचे राजकारण पुढे नेले. सुप्रिया यांनी असं कधी बोलून दाखवलंय की, मी सुप्रिया सुळे ऐवजी, सुप्रिया पवार सुळे लावलं असतं तर आत्ता मला अधिक फायदा झाला असता? असा प्रश्न विचारला असता, पवार म्हणाले, "लग्न झाल्यानंतर सुप्रिया पवारची सुळे झाली. पवार आडनाव लावून लाभ घेण्याचा विचार सुप्रियाच्या मनात कधी आला नाही. सुप्रिया सुळे या नावानेच ती लोकांच्या समोर, मग महाराष्ट्र असो, देशपातळी असो, ती जात होती."
मी बारामतीला ज्या घरात राहतो ते घर सुप्रियाचं -काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांना निशाणा करत, बाहेरचे आणि मुळचे पवार, या आशयाचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात बरीच चर्चाही झाली. यावरून त्यांच्यावर टीकाही झाली. पुन्हा एकदा या मुद्द्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, "बाहेरचे आणि घरचे चर्चा, (बाहेरचे आणि मुळचे पवार वाद) आता सुप्रिया पुरते सांगायचे झाल्यास, ती बाहेरचे असण्याचे काही कारण नाही. तिचं गाव, तिचं घर, तिची शेती, सर्व बारामतीला आहे. मी बारामतीला ज्या घरात राहतो ते घर तिचेच (सुप्रियाचं) आहे. तिथली शेती तिच्याच नावावर आहे. फक्त एकच आहे की, येथे अजित पवार बघत आहेत, आपण स्थानिक राजकारणात पडायचं नाही. निर्णय घेण्याची प्रक्रिया अजित पवारांकडे आहे. त्यात आपण हस्तक्षेप करायचा नाही. ही एक सुसंस्कृतपणाची, समंजस पणाची आणि कुटुंबामध्ये एक वाक्यता राहावी त्यासाठी आपण कुठपर्यंत जायचे, या मर्यादा लक्षात घेऊन काम करावे, हे सूत्र तिने पाळले," असेही पवार म्हणाले.
ननंद भावजय असा घरातच सामना होईल, असं कधी वाटलं? -यावर बोलताना पवार म्हणाले, "गेली चार-सहा महिने ज्या पद्धतीने हालचाल सुरू होती, त्यामुळे जाणवत होते, असं काही तरी होईल," असंही पवार यांनी यावेळी सांगितले.