सुनील चावके मुंबई/नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तासंघर्षाच्या या नाट्यमय घटनाक्रमावर भाजप ‘निःपक्ष’ नजर ठेवून आहे. या लढाईत जो जिंकेल, त्याला विजयी टिळा लावून ‘स्वागत’ करण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे. काही विशिष्ट उद्देशानेच शरद पवार यांनी राजीनामा अस्त्र वापरले आहे. खेळ त्यांनी सुरू केला आणि त्याचा शेवटही तेच करतील, असा विश्वास दिल्लीतील शरद पवार यांच्या राजकीय सहकाऱ्यांना वाटत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विखुरला जाऊ नये आणि अंतर्गत कलहात सापडलेले आपले घर वाचावे आणि म्हणून शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन शेवटचा पत्ता खेळला असल्याचे भाजपला वाटते. महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्ष ठेवून असलेल्या भाजप नेत्यांच्या मते शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील रस्सीखेचीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकसान झाले, यात शंकाच नाही. तूर्तास आपले घर वाचवले, या समाधानापलीकडे शरद पवार यांना या रस्सीखेचीतून काहीही फायदा होणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर नजर ठेवून असलेल्या भाजप नेत्यांना वाटत आहे.
पवार यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अभूतपूर्व कलह निर्माण झाला आहे. पवार यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावावर सर्वसंमतीने शिक्कामोर्तब होणे मुश्कील आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल ही चार नावे चर्चेत आहेत. पण, या नावांवर सर्वांची सहमती होईलच, याची शाश्वती नाही. या संघर्षात अजित पवार बाजी मारतील आणि त्यांना भाजपच्या गळाला लावून राज्याच्या राजकारणात वर्चस्व प्रस्थापित करणे शक्य होईल, असे गणित भाजपच्या गोटात मांडले जात आहे.
अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन पवार यांनी नेमकी कोणती खेळी केली, याविषयी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. वयाच्या ८३व्या वर्षीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला पर्याय नाही, हे पवार यांनी दाखवून देण्यासाठीच त्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसण्याची धूर्त खेळी खेळल्याचे मानले जात आहे.
तुम्ही गैरसमज करून घेताय - अजित पवारतुम्ही एक गैरसमज करून घेताय. पवार अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षात नाहीत, अशातला भाग नाही. आज काँग्रेसमध्ये अध्यक्ष आहेत खरगे; पण काँग्रेस चालली आहे सोनिया गांधींकडे बघून. त्यामुळे पवारांच्या वयाचा विचार करता, सगळ्यांशी चर्चा करून एका नवीन नेतृत्वाकडे आपण ही जबाबदारी देऊ पाहतो. ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम करेल, शेवटी साहेब म्हणजेच पक्ष आहे, हे कुणी सांगण्याचे कारण नाही. आता पवारांनी हा निर्णय घेतला आहे. ते आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतील. भावुक होऊ नका, भाकरी फिरवायची असते, असे पवारांनी सांगितले पण त्यांनी स्वतःपासून निर्णय घेतला आहे. पवार आज तरी निर्णयावर ठाम आहेत, तुम्हीही भावुक होऊन आम्हाला पर्याय नाही, असे बोलू नका, साहेब आहेतच. तुम्हा आम्हाला दुसरा पर्याय आहे का; पण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अध्यक्ष होईल, आपण सगळे त्याला साथ देऊ. साहेबांच्या डोळ्यादेखत नवा होणार अध्यक्ष तयार झाला, तर तुम्हाला का नको आहे?