"शरद पवार यांचे ‘ते’ विधान धादांत खोटे"; २००४च्या मुद्द्यावरून अजित पवार यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 01:50 PM2024-05-28T13:50:30+5:302024-05-28T13:50:59+5:30
भाषणात अजित पवार यांनी शरसंधान साधताना १९९१ पासूनच्या शरद पवार यांच्या राजकारणावर भाष्य केले
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात २००४ साली राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री केला असता, तर पक्ष फुटला असता हे शरद पवारांनी केलेले विधान धादांत खोटे आहे, असा पलटवार उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत शरद पवार यांनी याबाबत विधान केले होते. अजित पवार गटाची बैठक सोमवारी गरवारे क्लब येथे पार पडली. यावेळी केलेल्या भाषणात अजित पवार यांनी शरसंधान साधताना १९९१ पासूनच्या शरद पवार यांच्या राजकारणावर भाष्य केले.
ते म्हणाले, २००४ साली आम्हाला वाटत होते, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करावा. मला तेव्हा मुख्यमंत्रीपदात रस नव्हता. तेव्हा भुजबळ मुख्यमंत्री होतील, असे मला वाटत होते. कारण राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हा राज्याच्या काेनाकोपऱ्यात पक्ष पोहोचवण्याचे काम भुजबळांनी केले. पद्मसिंह पाटील हेही नवे नव्हते. १९९१ ला शरद पवारांना संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीत जाण्याची वेळ आली तेव्हा एकत्र काँग्रेस होती. आम्ही सगळ्या आमदारांनी पद्मसिंह पाटील यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी दिले होते. पण शरद पवारांनी सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री केले. नाईक यांनी तेव्हा शरद पवारांचे काहीच ऐकले नाही, त्यामुळे त्यांचा कार्यक्रम शरद पवारांनी केला. त्यासाठी आम्हा १७ लोकांना मंत्रिमंडळातून काढले. त्यानंतर १५ वर्षांनी २००४ साली मुख्यमंत्रीपदाचा विषय आला. तेव्हा सगळे नवखे नव्हते. नाईक यांना मुख्यमंत्री केले तेव्हा त्यांनी आपले ऐकले नाही, आता जर कुणाला मुख्यमंत्री केले, तर हे आपल्याला कायमचे दिल्लीला पाठवतील, त्यामुळे कदाचित त्यांनी २००४ साली मुख्यमंत्रीपद घेतले नसेल, असा टोला अजित पवारांनी लगावला.
‘...ते ब्रह्मदेव आला तरी सांगू शकणार नाही’
महाविकास आघाडीत एकत्र काम करत होतो, तेव्हा आम्हाला सांगितले जायचे, शिवसेनेविरोधात टोकाची भूमिका घ्या.
मी विचारायचो का? तर सांगितले जायचे शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्याक समाजाला फार आनंद वाटतो. यावेळी तर अल्पसंख्याक समाज शिवसेनेबरोबरच जायला निघाला होता. त्यामुळे कुठे कसे गणित बदलते ते ब्रह्मदेव आला तरी सांगू शकणार नाही, असे अजित पवार यावेळी म्हणाले.