Sharad Pawar Rajya Sabha Election ( Marathi News ) : महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटल्यानंतर आता राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसमधील नेतेही पक्षांतर करू लागले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. चव्हाण यांच्यासारख्या मातब्बर नेत्याच्या पक्षांतरामुळे आगामी काळात काँग्रेसला आणखी धक्के बसण्याची चर्चा रंगू लागली आहे. अशातच काही दिवसांनी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीवरही याचा परिणाम होऊ शकते. अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. त्यामुळे काँग्रेसचे काही आमदार क्रॉस वोटिंग करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेसाठी महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचं नाव सुचवल्याचे समजते.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस रंगणार असून महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही ही जागा जिंकण्यासाठी दुसऱ्या पक्षाच्या मतांची गरज भासणार आहे. अशा स्थितीत शाहू छत्रपती यांना उमेदवारी देऊन विजयश्री खेचून आणता येऊ शकते, असा प्रस्ताव शरद पवार यांच्याकडून मविआ नेत्यांसमोर मांडला गेल्याची माहिती आहे. शाहू छत्रपतींच्या नावासाठी शरद पवार आग्रही असल्याने मविआकडून याबाबत काय अंतिम निर्णय घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संजय राऊतांनीही सुचवलं होतं नाव
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही शाहू छत्रपती यांचं नाव सुचवलं होतं. राऊत यांनी काही दिवसांपूर्वी एक्सवर पोस्ट लिहीत म्हटलं होतं की, "राज्यसभा बिनविरोध होणार? सहाव्या जागेसाठी सगळ्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा विचार करायला हवा. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून ३० मते वेगळी आहेत, इतरही येतील," असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. तसंच या पोस्टमध्ये राऊत यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही टॅग केलं होतं.
दरम्यान, देशभरात राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ५६ जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यसभेच्या या ५६ जागांपैकी ६ जागा महाराष्ट्रातील आहेत. २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीत कोणत्या जागेवर कोणता पक्ष बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलाबल
भाजपा : १०४, राष्ट्रवादी (अजित पवार गट) : ४२. शिवसेना (एकनाथ शिंदे गट): ४०, काँग्रेस : ४४, शिवसेना उद्धव ठाकरे गट : १६ राष्टवादी काँग्रेस (शरद पवार गट) : ११, बहुजन विकास आघाडी : ३, समाजवादी पक्ष, एआयएम आणि प्रहार जनशक्ति प्रत्येकी २, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सीपीआयएम, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ति, क्रांतीकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी १ आणि अपक्ष १३... एकूण २८७