नागपूर - पक्ष चालवायचा म्हणुन शरद पवार हे अनिल देशमुख यांचे समर्थन करतात. पण पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याकडून हे अपेक्षित नाही. देशमुखांनी पैसे गोळा करण्याची मागणी केली पण पैसे गोळा केले का, असे म्हणून त्यांचे समर्थन करणे योग्य आहे का, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
शनिवारी रात्री नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, अमरावतीत घटना झाली, ती कशामुळे झाली ? कुठलीही घटना त्रिपुरात घडली नसताना, कपोलकल्पित घटनेच्या आधारावर मोर्चे काढून हिंदुंची दुकाने तोडण्यात आली. यावर तथाकथित सेल्युलर का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. प्रश्न कोणी निर्माण केला, यापासून दूर भटकून अशाप्रकारे भाजपवर आरोप करुन प्रश्न कधी सुटणार नाही, असेही ते म्हणाले.
नुकत्याच झालेल्या विदर्भ दौऱ्यामध्ये शरद पवार यांनी अनिल देशमुखांचा बचाव केला होता. अनिल देशमुखांच्या तुरुंगातील प्रत्येक तासाची किंमत तुम्हाला मोजावी लागेल असा इशारा शरद पवार यांनी दिला होता. त्यावेळी पवार म्हणाले होते की, 'मी नागपुरात आलो आहे आणि अनिल देशमुख येथे नाहीत, असं प्रथमच घडलं आहे. महाराष्ट्रातील सत्ता हातातून गेल्याने भाजपची मंडळी अस्वस्थ झाली असून सत्ता मिळवण्यासाठी तिन्ही पक्षांतील नेत्यांच्या मागे वेगवेगळ्या एजन्सीज लावण्यात आल्या आहेत. एकनाथ खडसे, हसन मुश्रीफ, संजय राऊत, अजित पवार यांच्या कुटुंबांना त्रास दिला जात आहे. अनिल देशमुख यांची अटकही त्यातूनच झाली आहे. देशमुखांना तुम्ही तुरुंगात टाकलं असलं तरी तुरुंगातील त्यांच्या प्रत्येक दिवसाची, प्रत्येक तासाची किंमत जनता तुमच्याकडून वसूल करणार आहे', असा इशाराच पवार यांनी यावेळी दिला होता.