नागपूर - मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या मनोज जरांगेंच्या मागणी प्रत्यक्षात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. मागच्या लोकसभेत ३१ उमेदवार हे मराठा समाजाचे निवडून गेलेत. पवार सर्वपक्षीय बैठकीला जात नाही. स्वत:चे मत मांडत नाही. याचा सरळ अर्थ असा की शरद पवारांचा मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला पाठिंबा आहे. जर असं नसतं तर शरद पवारांनी भूमिका मांडली असती असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, लोकसभेप्रमाणे विधानसभेत पुन्हा पुनरावृत्ती झाली मराठा समाजाचं बहुमत होईल. त्यानंतर सभागृहात ठराव करण्यात येणार आहे. ओबीसींची मागणी आहे जनगणना करण्याची ती आम्ही मान्य करतो. ती जनगणना होत नाही तोपर्यंत हे सभागृह ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देतेय असं मंजूर करण्यात येईल. त्यामुळे सर्व ओबीसी समाजाला आम्ही आवाहन करतोय. विधानसभेत ओबीसींचे १०० आमदार असले तरच हा ठराव रोखू शकतात ही सध्याची परिस्थिती आहे. आरक्षणाच्या जागा महत्त्वाच्या आहेत. एससी, एसटी आरक्षण असेल ते ओबीसीच्या मतांवर निवडून गेले तर ओबीसींच्या बाजूने मतदान करतील आणि ते जर मराठा समाजाच्या बाजूने गेले तर मराठा समाजाला मतदान करतील. त्यामुळे ओबीसींनी राखीव जागांवर प्रचंड ताकदीने मतदान केले पाहिजे असं त्यांनी सांगितले. एबीपी माझाच्या मुलाखतीत ते बोलत होते.
तसेच भाजपा ओबीसीचा मित्र नाही. भाजपा ओबीसीचा दुश्मन आहे. धर्म धोक्यात आलेला नाही तर आरक्षण धोक्यात आले आहे. भाजपा ओबीसीच्या बाजूने आणि जरांगेंच्या विरोधात आहोत असं कुठेही विधान आलेले नाही. तेव्हा तेली, माळी, कोळी, सोनार, लोहार, कुंभार यासह इतर ओबीसीतील घटकांनी एक ठरवलं पाहिजे. जोपर्यंत ओबीसी आरक्षणाला पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत त्या पक्षांना आम्ही मतदान करणार नाही ही भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे असंही आवाहन प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी समाजाला केले.
दरम्यान, हे ३१ खासदार मनोज जरांगे पाटलांना भेटले. तुमच्यामुळे निवडून आलो असं सांगितले आहे. त्यामुळे हे कुणबी म्हणत असतील तर तुम्ही मतदान कोणाच्या बाजूने करणार आहात? ओबीसींनी कुणबी यांना निवडून आणले तर हा कुणबी मतदान कोणाला करणार? हा माझा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीमुळे ही दरी वाढलेली आहे. आम्ही मराठा समाजासोबत जाणार नाही असं कुणबी समाजानं आश्वासित केले पाहिजे असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.