Sharad Pawar News: लोकसभेत महायुतीला चितपट केल्यानंतर महाविकास आघाडीने आता राज्यातील विधानसभांवर लक्ष केंद्रीत केले असून, विधानसभेला महायुतीचे सरकार राहणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा दावा केला जात आहे. महायुतीसह महाविकास आघाडीचे नेते राज्याभरात दौरे, बैठका, सभा घेत आहेत. यातच आता शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोचक टोला लगावला आहे.
पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केले. निर्यातीची धोरण चुकीची आहेत. शेती अर्थव्यवस्था संकटात आली की, देशाची अर्थव्यवस्था संकटात येते, असे शरद पवार म्हणाले. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींना विनंती केली होती की, तुम्ही शरद पवार यांच्यावर टीका करु नका, अशा आशयाचा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना शरद पवार यांनी टोलेबाजी केली.
...तर आम्ही तुम्हाला स्थिर सरकार देऊ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवार यांचे काय बोलणे झाले हे मला माहिती नाही. पण माझे एकच म्हणणे आहे की, आता विधानसभेची निवडणूक आली आहे. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिक सभा घ्याव्यात. महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित करावे, म्हणजे आम्ही तुम्हाला स्थिर सरकार देऊ असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला. तसेच लोकसभेला पंतप्रधानांनी १८ सभा घेतल्या होत्या. यावेळी १४ ठिकाणी आमचे उमेदवार निवडून आले, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिले. राज ठाकरे यांनी दोन-तीनदा माझे नाव का घेतले, हे मला समजले नाही. पण मी या रस्त्याने कधी जात नाही. महाराष्ट्र मला थोडाफार ओळखतो. माझी पार्श्वभूमी अशी राहिलेली नाही. मीही मराठवाड्यात फिरत आहे, मलाही लोक अडवतात आणि निवेदन देतात. मग हेही मीच करत आहे का? मला आडवा आणि निवेदन द्या, हे मीच सांगतोय का? असे शरद पवार म्हणाले.