Sharad Pawar News: गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जाहिरातीवरून नाराजीनाट्य सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून महाविकास आघाडीचे नेते भाजप-शिंदे गटावर निशाणा साधत आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या प्रकरणी खोचक शब्दांत प्रतिक्रिया देताना भाजप-शिंदे गटावर निशाणा साधला.
आम्हालाही हे आत्ताच कळले. महाराष्ट्राचे हे भाग्य आहे. अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एका व्यक्तीच्या बद्दल नावलौकिकाची जाहिरात त्यांच्या कुठल्या हितचिंतकांनी दिली हे आम्हाला माहिती नाही. आमचा समज असा होता की, हे जे सरकार बनले आहे यामध्ये मोठी संख्या ही भाजपची आहे. या जाहिरातीमुळे आम्हा लोकांच्या ज्ञानात भर पडली की, भाजपचे यामध्ये योगदान जास्त नाही अन्य घटकांचे आहे. हे महाराष्ट्राला कळवण्याचे ऐतिहासिक काम या जाहिरातीच्या माध्यमातून झाले आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद, या खोचक शब्दांत शरद पवार यांनी भाजप-शिवसेना शिंदे गटाला कानपिचक्या दिल्या.
ही लाभदायक गोष्ट ठरली आहे
या जाहिरातीमुळे भाजप आणि शिवसेनेत कुरबुरी सुरु झाल्या. त्यामुळे मोठ्या टीकेनंतर शिवसेनेला पुन्हा जाहिरात देत खुलासा द्यावा लागला होता. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, एवढ्या मोठ्या जाहिरातील सर्व पेपरना दिल्या आहेत. ही लाभदायक गोष्ट ठरली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीवर टीका केली आहे. वंचित पायात पाय घालण्यासाठी तयार केलेली बी टीम आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मागची निवडणूक आठवली तर थोडा फटका आम्हाला बसला होता. नुकसान सहन करावे लागेल. ते नुकसान वंचितच्या वतीने करण्यात आले. लोकशाहीमध्ये सर्वांचा अधिकार आहे.कुणाला कुठही जाऊन काम करण्याचा अधिकार आहे. पण महाराष्ट्रात अस दिसतय की स्वत: लढायच असत आणि दुसऱ्या एकदोन टीम तयार करायच्या असतात. पायात पाय घालण्यासाठी याला राजकारणाची बी टीम म्हणतात. ही बी टीम आहे की काय आता कळेल, असे शरद पवार यांनी सांगितले. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर महाराष्ट्रात पाया पक्का करत आहेत. यासंदर्भात शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता.