Prakash Ambedkar ( Marathi News ) :वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात पक्षाने आरक्षण बचाव यात्रा काढली आहे. या यात्रेला चैत्यभूमी, दादर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज सुरुवात झाली. त्यानंतर वीर भाई कोतवाल यांना अभिवादन करून ही यात्रा पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे पोहोचली. तिथं प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "शरद पवार यांनी मध्यंतरी म्हटलं होतं की, आम्ही समाजाचे २२५ आमदार निवडून आणू. त्यानंतर ओबीसींमध्ये चलबिचल निर्माण झाली. यातून एका समूहाची सत्ता आणायचा प्रयत्न आहे. यातून असे दिसते की, ओबीसीचे आरक्षण कायमस्वरूपी स्थगित करण्याचा डाव आहे. पवारांनी समाज हा शब्द वापरल्यामुळे वातावरण चिघळलं आहे," असा घणाघात आंबेडकर यांनी केला आहे.
"ओबीसींनी स्वतःचे १०० आमदार निवडून आणावेत. राजकीय ओळख ओबीसी म्हणून आहे. एवढे आमदार निवडून आणले तरंच आपल्याला ओबीसी आरक्षण वाचवता येईल. एससी आणि एसटी यांचे आरक्षण संविधानिक आहे, तसेच ओबीसी आरक्षण संविधानिक झाले पाहिजे," अशी मागणीही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. तसंच मिळालेल्या अधिकारांच्यासोबत राहायचे की, संघटना आणि पक्षांसोबत याचा निर्णय घेण्याची आता निर्णायक वेळ आली आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, ही मागणी कायदेशीर नाही, अशी भूमिका आंबेडकर यांनी मांडली आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांना एक पत्र लिहून आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. मात्र आता त्यांनी आरक्षण प्रश्नावरून पवार यांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे.
आरक्षण बचाव यात्रेच्या काय आहेत मागण्या?
वंचित बहुजन आघाडीकडून काढण्यात येणाऱ्या या यात्रेला सुरुवात होण्यापूर्वीच प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या मागण्या मांडल्या होत्या. "ओबीसींचे आरक्षण वाचायला हवं, एससी-एसटी विद्यार्थांची स्कॉलरशिप दुप्पट व्हावी, केवळ केंद्राचीच स्कॉलरशिप मिळते, इतर राज्यांप्रमाणे त्यात राज्य हिस्सा देत नाही. याच बरोबर, ओबीसींच्या विद्यार्थ्यांनाही एससी-एसटीला जी स्कॉलरशिप मिळते ती जशीच्या तशी लागू व्हायला हवी, घाई गडबडीत इश्यू करण्यात आलेला फॉर्म ऑफ कास्ट सर्टेफिकेट रद्द करावा, जे कुणबी आहेत, त्यांना आरक्षण मिळणारच, कारण ते ओबीसीमध्ये सामील आहे. तसेच, आरक्षणात एससी, एसटी बरोबरच ओबीसींनादेखील पदोन्नती मिळायला हवी," अशा मागण्या आंबेडकर यांनी केल्या आहेत.