BJP on Sharad Pawar Mata Sita Idol in Ram Mandir Ayodhya Controversy: नुकताच रामनवमीचा उत्सव सर्व देशभरात उत्साहाने साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर बोलत असताना राष्ट्रवादी (शरद पवार)च्या शरद पवारांनी एक दावा केला. राम मंदिराबाबत सर्वजण बोलतात, पण सीतेच्या मूर्तीबाबत कोणी का बोलत नाही अशी तक्रार एका बैठकीत महिलांनी केली असल्याचा दावा शरद पवार यांनी केला. ते म्हणाले की, एका मीटिंगमध्ये माझ्यासमोर असा एक विषय निघाला. तो विषय महिलांनी काढला महिलांनी अशी तक्रार केली की तुम्ही रामाचे सगळं करता मग सीतेची मूर्ती का नाही बसवली? पुरंदर येथे एका राजकीय भेटीसाठी गेले असताना शरद पवारांनी हा दावा केला. शरद पवार यांनी केलेल्या या आरोपावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.
"राम मंदिरात सीतामाईंची मूर्ती का नाही? असा जावईशोध शरद पवार यांनी लावला आहे. एरवी हेच पवार मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत आपण नास्तिक असल्याची शेखी मिरवत असतात. शरद पवारांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहेत पण पवारांना फक्त राजकारण करण्यात रस आहे. बरं जे शरद पवार निवडणुकीसाठी घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना आज सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच म्हणावा लागेल," अशी बोचरी टीका बावनकुळे यांनी शरद पवारांवर केली.
सीतामातेची मूर्ती का नाही याचे मंदिर ट्रस्ट आधीच दिलेले स्पष्टीकरण-
कर्नाटकातील मूर्तीकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामाच्या मूर्तीची निवड करण्यात आली. परंतु ही मूर्ती फक्त भगवान श्रीरामाची आहे. त्यासोबत सीता माता किंवा लक्ष्मण नाहीत. यामागचे कारण ट्रस्टने सांगितले आहे. भगवान श्रीरामाची मूर्ती ४ फूट ३ इंच आहे. काळ्या शिळेपासून ही मूर्ती तयार केली आहे. 150 ते 200 किलोग्रॅम मूर्तीचे वजन आहे. या मूर्तीसोबत सीता माता नाही. कारण पाच वर्षांचे रामलल्ला म्हणजे बालक रुपात रामलल्ला आहेत. ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले की, भगवान राम पाच वर्षांचे असल्यामुळे सोबत जानकी नाही. एकटे राम आहेत. परंतु वरच्या मजल्यावर राम आणि सीता आहेत. तसेच तीन भाऊ आणि भगवान हनुमान देखील आहेत.