शरद पवारांचा यू टर्न? आधी म्हणाले- ते आमचेच नेते, नंतर म्हणतात- तसे नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 06:00 AM2023-08-26T06:00:10+5:302023-08-26T06:01:47+5:30
पहाटेच्या शपथविधीनंतर एकदा संधी दिली होती. संधी सारखी मागायची अन् द्यायचीही नसते: शरद पवार
लोकमत न्यूज नेटवर्क, बारामती/सातारा : अजित पवार हे आमचेच नेते आहेत, राष्ट्रवादीत फूट नाही, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शुक्रवारी सांगितले. कोल्हापूर येथील सभेला बारामतीतून निघण्यापूर्वी त्यांच्या गाेविंदबाग निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागल्यानंतर मात्र त्यांनी दहीवडी (जि. सातारा) येथील जाहीर सभेत बोलताना घुमजावदेखील केले. पहाटेच्या शपथविधीनंतर एकदा संधी दिली होती. संधी सारखी मागायची अन् द्यायचीही नसते, असे स्पष्ट करत त्यांनी अजित पवार यांना आता संधी नसल्याचा इशाराच सभेत दिला.
काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लगेच त्याला पक्षात फूट पडली असे म्हणू शकत नाही, असे पवार बारामतीत म्हणाले. बारामतीकरांनी अजित पवार यांचा आयोजित नागरी सत्कार अवघ्या २४ तासांवर आलेला असताना पवार यांनी हे वक्तव्य केले, हे विशेष.
माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे केलेल्या वक्तव्याबाबत पवार यांना प्रश्न केला असता, त्यावर सुप्रिया सुळे यांच्या मताचे शरद पवार यांनी समर्थन केले. ते आमचेच आहेत. त्यात काही वाद नाही. काही लोकांनी पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. म्हणून लगेच फूट म्हणायचं काही कारण नाही, असे शरद पवार म्हणाले.
बीड येथील माझ्या सभेनंतर जर कोणी तिथे आपली भूमिका मांडण्यासाठी येत असेल तर त्याचे लोकशाहीमध्ये स्वागत व्हायला हवे, असेही शरद पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले... ‘नो कमेंट्स’
- ‘अजित पवार आमचेच नेते आहेत’, असे शरद पवार म्हणाले आहेत याकडे लक्ष वेधले असता अजित पवार यांनी, ‘नो कमेंट्स, फक्त विकासाचे बोला, असे पिंपरी (पुणे) येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
- सर्वसामान्य लोकांना विकास हवाय. तुम्ही लोक जसे पाहता, त्याउलट मी पाहतो. मला विकासाशिवाय इतर कशावरही भाष्य करायचे नाही’, असे म्हणत त्यांनी राजकीय प्रश्नांना बगल दिली.