लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्रातील जातीपातीचे राजकारण टोकाला पोहोचले आहे. जरांगे यांच्या आडून पवार आणि उद्धव हे राजकारण करत आहेत. काल बीड येथे जे घडलं त्यामागे जरांगे नसून ठाकरे आणि पवार असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा महागात पडेल,’ असा इशारा दिला.
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी ठाकरे शनिवारी येथे आले होते. ते म्हणाले, राज ठाकरे मराठा आरक्षणाविरोधात आहे, अशा बातम्या पेरल्या गेल्या. खरे तर जातीपातीचा विचार न करता गरिबांना आरक्षण मिळाले पाहिजे.
त्यांचा तर दंगली घडविण्याचा उद्देश
शरद पवार यांच्यासारख्या नेत्याने महाराष्ट्राचा मणिपूर होईल असे विधान करणे म्हणजे त्यांचा उद्देश दंगली घडविण्याचा असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
चार पक्षांचे वाटे होईना, मी कशाला जाऊ...
लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणारे राज ठाकरे हे आता महायुतीविरोधात प्रचार करणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना ठाकरे म्हणाले, आधीच या चार पक्षांच्या जागा वाटपाचे वाटे होईना, असे असताना मी कशाला तिकडे जाऊ, असे त्यांनी नमूद केले.