मुंबई : राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी संशयित आरोपी असलेल्या अजित पवार यांनी आज आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला. कारण गुलदसत्यात असताना अजितदादांच्या या पावलाबाबत खुद्द शरद पवारच अंधारात होते का, असा सवाल उपस्थित होत आहे.
ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये शरद पवार यांचे नाव आले होते. यामुळे शरद पवार यांनी थेट ईडीच्या कार्यालयातच जाण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे राज्यातील वातावरण तापलेले होते. मात्र, ईडीचा खुलासा आणि पोलिसांच्या विनंतीनंतर शरद पवारांनी जाणे रद्द केले होते. यानंतर काही वेळातच अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली.
ईडीच्या कार्यालयात जाणे रद्द केल्यानंतर शरद पवार हे पुण्यातील पूरग्रस्तांना भेटण्यासाठी रवाना झाले. मात्र, अजित पवार तेव्हा मुंबईत होते, अशी माहिती समोर आली आहे. शरद पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समक्षच अजितदादांना बारामती मतदारसंघात पूरग्रस्तांसाठी थांबण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, तरीही अजितदादा मुंबईत आले आणि त्यांनी सायंकाळी विधानसभाध्यक्षांच्या पीएकडे 5.40 राजीनामा दिला. यामुळे जर अजित पवार राजीनाम्याचे पाऊल उचलणार होते तर शरद पवार पुण्याकडे कसे रवाना होऊ शकतात असा सवाल उपस्थित होत आहे.
निवडणुकीची पार्श्वभूमी आणि ईडीला नमविल्याचा आवेश असताना अजित पवारांचा एवढा मोठा निर्णय शरद पवारांना अंधारात ठेवून घेतला का, असा सवालही समोर येत आहे. महत्वाचे म्हणजे शरद पवार हे पुण्यातील पूरग्रस्तांना भेटण्यासाठी अरण्येश्वरला जाणार होते. मात्र, अजित पवारांनी राजीनामा दिल्याचे कळताच त्यांनी हा दौरा रद्द करत पुण्यातील मोदीबागेतील राहत्या घरी पत्रकार परिषद आयोजित केली. यामुळे अजित पवारांनी खुद्द शरद पवारांनाच अंधारात ठेवल्याची चर्चा होत आहे.