मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची इंदू मिल येथील भेट निव्वळ राजकीय भेट होती. राष्ट्रवादी काँग्रेसची अनुसूचित जातीच्या मतदारांना आपल्याकडे आकर्षीत करायची योजना आहे. त्यामुळेच पवारांनी इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या जागेची पाहणी केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
शरद पवार यांनी बुधवारी इंदू मिल येथील प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेची पाहणी केली. याआधी आजित पवार यांनी देखील स्मारकाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता. या सर्व घडामोडीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनुसूचित जातींची मते नाहीत. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला ही मते मिळाली नाहीत. ही बाब दोन्ही पक्षांच्या लक्षात आली आहे. या मतदारांना आकर्षीत करण्यासाठी राष्ट्रवादीने इंदू मिलच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शरद पवार यांनीही इंदू मिलमधील स्मारकाच्या जागेची पाहणी केल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला.
दरम्यान पक्ष म्हटल्यावर राजकारण हे करणे आलेच. परंतु, राष्ट्रवादीला याचा काहीही फायदा होणार नाही. मतदार नेहमी पक्ष पाहतात. त्यामुळे त्यांनी खुशाल प्रयत्न करावे, असा सल्लाही प्रकाश आंबेडकरांनी दिला.