मुंबई - Electoral Bonds to NCP ( Marathi News ) सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर इलेक्टोरल बॉन्डची माहिती एसबीआयनं जारी केली आहे. त्यानंतर आता ही सगळी माहिती निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर जाहीर केलीय. या इलेक्टोरल बॉन्डमधून महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनाही मिळालेल्या देणगीचे आकडेही समोर आलेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बॉन्डच्या माध्यमातून ६५.६ कोटी रुपये मिळाल्याची माहिती आहे.
गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला २०१८ ते जानेवारी २०२४ या कालावधीत जवळपास ६५.६ कोटी रुपये इलेक्टोरल बॉन्डमधून मिळाले आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, पक्षाला ५०.५ कोटी रुपये बॉन्डच्या माध्यमातून मिळालेत. २०१९ पर्यंत आम्हाला ३१ कोटी आणि त्यानंतरच्या काळात २० कोटी असे मिळून ५० कोटीच्या आसपास देणगी मिळाली. त्यातील बहुतांश रक्कम ही २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आम्ही खर्च केली. आता आमच्याकडे फक्त ७ लाख रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे ६५ कोटी आकडा कसा आलाय याबाबत मला काही कल्पना नाही. आम्ही निवडणूक आयोगाकडून माहिती घेऊ असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीपर्यंत सर्व व्यवहार पार पडले. त्यानंतर जुलै २०२३ मध्ये फूट पडल्यानंतर फुटलेला गट आम्हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा करत होती. त्यामुळे SBI ला पत्र पाठवून ते खाते गोठवण्यात आले. आता आम्हा दोघांचे वेगवेगळी खाती आहेत अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली. तर पैशांबाबतचे सर्व व्यवहार हे पक्षात फूट पडण्यापूर्वीचे आहेत. आता आमच्या पक्षाकडे कुठलेही इलेक्टोरल बॉन्ड नाहीत. त्यामुळे बॉन्डचा आणि आमच्या पक्षाचा काही संबंध नाही. परंतु पुढील काळात आम्ही पक्षासाठी देणगीदार मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत असं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं. ही बातमी TOI ने दिली आहे.
दरम्यान, NCP एकत्र असताना शरद पवारांच्या उद्योगपती मित्रमंडळींकडून पक्षाला देणगी मिळत होती. त्यात बहुतांश पुण्यातील कंपन्या आहेत. Neotia फाऊंडेशन, भारती एअरटेल, सायरस पुनावाला, युनायटेड शिपर्स, वादग्रस्त बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले, बजाज फायनान्स, अतुल चोरडिया, ओबेरॉय रियॅलिटी, अभय फिरोडिया यासारख्या देणगीदारांचा समावेश आहे. या सगळ्या देणगीदारांचा खुलासा मे २०१९ पर्यंत निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीतून झाला आहे.
बांधकाम आणि रिअल इस्टेटमधून सर्वाधिक देणगी
राष्ट्रवादी काँग्रेसला २८.५ कोटींचा इलेक्टोरल बॉन्ड हा एप्रिल २०१९ पासून बँक खाती गोठवण्यापर्यंत मिळाला आहे. त्यातील मोठे देणगीदार Qwik Supply Chain कंपनीकडून १० कोटी, इंडिगोचे राहुल भाटिया ३.८ कोटी, टोरंट पॉवर कंपनी ३.५ कोटी आणि मगरपट्टा टाऊनशिप डेव्हलपमेंट ३ कोटी इतके मिळाले आहेत. तर इतर छोट्या देणगीदारांमध्ये महालक्ष्मी विद्युत, नांदेड सिटी डेव्हलपमेंट आणि कन्स्ट्रशन, अंबुजा हाऊसिंग अँन्ड अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर. चंदा इन्वेस्टमेंट अँन्ड ट्रेडिंग आणि गोवा कार्बन अशा विविध बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांकडूनही देणगी मिळाली आहे.