पुणे : काही दिवसांपूर्वीच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली आणि अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) वेगळे झाले. तेव्हापासून दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर टीका करतना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही भाजपशी हातमिळवणी केलेल्या नेत्यांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
यावेळी शरद पवार म्हणाले की, 'ईडीच्या (सक्तवसुली संचालनालय) कारवाईच्या भितीने आमच्यातले काहीजण भाजपसोबत गेले आहेत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतच आहोत. आम्ही आमची वैचारिक भूमिका बदलली नाही. तुरुंगात जावं लागू नये, म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सत्याची कास सोडून असं वागणाऱ्या लोकांना सामान्य जनता वेगळ्या ठिकाणी पाठवल्याशिवाय राहणार नाही,' अशी टीका शरद पवारांनी केली.
ते पुढे म्हणतात की, आज देशात महागाई, गुन्हेगारी वाढत आहे. शेतकऱ्यांना बाजारपेठेत योग्य भाव मिळत नाही. गेल्या सहा महिन्यांत गुजरात किंवा अन्य राज्यात किती प्रकल्प गेले. जो कारखाना राज्यात येणार होता, तो अन्य राज्यात गेला. चांगली कामे करण्याची संधी राज्य सरकारने गमावली आहे. तुम्ही गुजरातमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये कारखाने अवश्य काढा, परंतु जे कारखाने इथे येणार होते, ते तिकडे नेणं योग्य नाही. यामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांचा रोजगार गेला,' असंही ते यावेळी म्हणाले.
'देशाचे महत्वाचे नेते सत्तेचा गैरवापर करत आहेत. ते नेहमी बातम्यांवर लक्ष ठेवून असतात. कुणी काही टीका टिप्पणी केली की, शासनाच्या महत्वाच्या व्यक्तींकडून त्या चॅनलला फोन करुन इशारा दिला जातो. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संसारात हात घालण्याचे काम केंद्राने केल. कांदा निर्यात शुल्क वाढवून सरकारने कांद्याचे भाव पाडले. कांद्यावर शुल्कवाढ केल्याने शेतकऱ्यांसाठी जगातले मार्केट बंद झाले,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.