Sharad Pawar vs Pm Modi: अजित पवार यांनी जेव्हापासून सरकारमध्ये प्रवेश केला, त्या दिवसापासून शरद पवार यांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष आहेत. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीतही दोन गट आहेत असे दिसून येते. पण असे असले तरी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त बैठका होत असल्याने विविध विषयांना व चर्चांन खतपाणी मिळताना दिसते. तशातच आता, शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका केली. अपेक्षेप्रमाणे भाजपाकडूनही त्यावर प्रत्यु्त्तर देण्यात आले.
मोदींवरील टीकेला भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून उत्तर
"ज्या शरद पवार यांना आपल्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही ते पवार साहेब आज पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्यावर टीका करीत आहेत. पवार साहेब तुम्ही राजकारण करताना कायम साडेतीन जिल्ह्यांचाच विचार केला आणि आज भाजप देशभरात कुठल्या राज्यात आहे आणि कुठल्या राज्यात नाही हे गणित सांगत सुटला आहात. मोदीजी पुन्हा येणार नाहीत असं भाकीत तुम्ही केलं पण तुमचं हे भाकीत खरं होणार नाही. कारण जनता मोदीजींच्या पाठीशी कालही होती आणि आजही आहे," अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
"समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम कुणी केलं हे महाराष्ट्रातील जनतेनं तुमचं सरकार असताना पाहिलंय. त्यामुळे मोदीजींकडे बोट दाखवण्यापूर्वी एकदा आपली कारकीर्द तपासून बघा. बाकी परिवार बचाव पार्टीला सोबत घेऊन तुम्ही कितीही ‘ घमंडीया‘ ची मोट बांधण्याचा प्रयत्न केला तरीही देशातील जनता २०२४ मध्ये सुद्धा मोदीजी आणि भाजपला साथ देईल. याबाबत आपण निश्चिंत राहावे," असेही त्यांनी म्हटले.
शरद पवार का म्हणाले?
"ज्यावेळी आपल्याला यश मिळणार नाही याची खात्री पटते तेव्हा माणूस या मार्गाला जातो. मला सध्या देशातील चित्र मोदी सरकारला अनुकूल दिसत नाही. हिंदुस्तानाचा नकाशा पाहिला तर केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल तिथे भाजपा सरकार नाही. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा इथली सरकारे पाडून भाजपा सत्तेत आले. निवडणुकीपूर्वी भाजपाची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार जनतेने केलाय. त्यामुळे मी पुन्हा येईल असं कितीही म्हटलं तरी त्यांची स्थिती देवेंद्रसारखी होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही," असे शरद पवार म्हणाले होते.