मुंबई - राष्ट्रवादीचे पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी रविवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीला उपस्थित राहून महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षाला लागलेल्या गळतीवर बोलताना म्हणाले की, आज अनेक लोक पक्ष सोडत आहे. मात्र आपण सर्वांनी, कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी असा सल्ला त्यांनी आलेल्या महिला कार्यकर्त्यांना दिला.
मुंबई येथे रविवारी राष्ट्रवादी पक्षातील महिला कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणातून पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्यांचा समाचार घेतला. आज अनेक लोक पक्ष सोडत आहे. मात्र जे लोक खटल्यात आहेत त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहे. त्यामुळे पक्षगळती होत आहेत. आपण पूर्ण स्वच्छ आहात तर आपल्याला कसलीच चिंता नाही. यापुढे आपण आपण सर्वांनी, कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करावी असेही पवार म्हणाले.
येणाऱ्या निवडणुकीला सामोरे कसे जावे याकडे आपण प्रयत्न करत आहोत. यात अनेक धोरणात्मक निर्णय घेतले जातील. माझा आग्रह हा आहे की आपण अडचणीतून जात आहोत. त्यासाठी तरुणांना व महिलांना पुढाकार देण्याचे काम केलं जाईल. पक्षातील नवीन चेहरे समोर आणण्यासाठी विचार केला जाईल, असेही यावेळी पवार म्हणाले.