मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केल्याने विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आमने सामने आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमधील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचं वृत्त आहे. सोमवारी ही भेट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत मिळत असलेल्या माहितीनुसार राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळ मागितली होती. त्यानुसार उद्या दुपारी ३ वाजता शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट होण्याची शक्यता आहे. तसेच या भेटीमध्ये राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते हजर राहिले नव्हते. त्यावरून सत्ताधारी महायुतीने महाविकास आघाडीवर टीका केली होती. तसेच शरद पवार यांच्या सांगण्यावरून महाविकास आघाडीचे नेते या बैठकीले गेले नाहीत, असा आरोपही झाला होता. त्यानंतर छगन भुजबळ यांनी अचानक शरद पवार यांची भेट घेतली होती. तसेच या आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील वातावरण कलुषित झाल्याचं सांगत परिस्थिती निवळण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली होती.