'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 04:08 PM2024-10-31T16:08:59+5:302024-10-31T16:11:00+5:30
Sharad Pawar Chhagan Bhujbal News: अजित पवारांनी वेगळी राजकीय भूमिका घेतल्याने पवार कुटुंबात दरी निर्माण झाली आहे. त्याबद्दल बोलताना छगन भुजबळ यांनी एक महत्त्वाचं विधान केलं.
Chhagan Bhujbal on Sharad Pawar: "शरद पवारांची विधानं आहेत, तसं काळजी करण्याचं कारण नाही. पवार साहेब (शरद पवार) कुटुंब फुटू देणार नाहीत", असे विधान अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत छगन भुजबळ यांनी केले. ते नाशिक येथे बोलत होते.
भुजबळ म्हणाले, जे पाहतोय ते दुःखदायक
पवार कुटुंबातील निर्माण झालेल्या दुराव्याबद्दल छगन भुजबळ म्हणाले, "मी परमेश्वराकडे प्रार्थना करतोय... खरं म्हणजे दिवाळीच्या वेळेला विशेषतः पाडव्याच्या दिवशी पवार साहेबांना भेटायला पक्षातील आणि हितचिंतक सगळे एकत्र यायचे. सगळं कुटुंब. त्याचं कुटुंब खूप मोठं आहे. त्यांच्या सूना आहेत, काही परदेशातील आहेत. सगळं एकत्रित यायचे, पण हे पाहतोय. ते काही फार आनंददायी मला वाटत नाही."
"दुःखदायक आहे. मी आता एवढीच प्रार्थना करतो की, निदान या निवडणुकीनंतर तरी पवार कुटुंबियांचा आनंद एकत्रित यावा. भले त्यांचे राजकीय पक्ष, राजकीय विचारधारा... कुणी काय घेतली असेल, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. मला असं वाटतं की, पवार साहेब... त्यांची विधानं आहेत, तसं काळजी करण्याचं कारण नाही. ते कुटुंब काही फुटू देणार नाहीत", असे छगन भुजबळ म्हणाले.
"मी समीरला म्हणालो, तर तुला राजीनामा द्यावा लागेल"
नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघातून समीर भुजबळ अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या उमेदवारीबद्दल बोलताना छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्यावरही टीका केली.
छगन भुजबळ म्हणाले, "नांदगावमध्ये वेगळी परिस्थिती आहे. तिथली परिस्थिती काय आहे, ते व्हायरल झालेली शिवीगाळ, दाखल झालेला गुन्हा यावरून तुमच्या लक्षात येत असेल. पोलिसांना सुद्धा दहशत, दादागिरी ते करत आहेत. मग निवडणूक नसेल, तर पाच वर्षात काय झालं असेल?", असे भुजबळ म्हणाले.
"म्हणून भयमुक्त नांदगाव घोषणा समीर भुजबळ यांनी दिली आहे. एक लक्षात ठेवा समीर भुजबळ अपक्ष लढतोय. मी त्याला त्यावेळीच सांगितलं होतं की, तुला लढायचं असेल, तर आमच्या पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल. आणि त्याने राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तो लढतोय", असे भाष्य छगन भुजबळ यांनी केले.