मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा कायदेशीर लढाईची पुनरावृत्ती पाहायला मिळत आहे. एक वर्षापूर्वी शिवसेना ठाकरे गटावर जी वेळ आली होती तशीच वेळ आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर आली आहे. येत्या ५ जुलैला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत होणार असून या बैठकीला पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. याच बैठकीला येणाऱ्या कार्यकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी शिस्तपालन समितीकडून आता बंडखोर आमदारांवर कारवाई सुरू झाली आहे. त्याबाबत रितसर पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले आहे. शिस्तपालन समितीने अजित पवारांसह ९ आमदारांवर कारवाईचा प्रस्ताव ठेवला आहे. पक्षाविरोधी कृती केल्याप्रकरणी या सर्व आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे असा प्रस्ताव देण्यात आला आहे. यात पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, अकोलाचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.
कार्यकर्त्यांकडून ‘असं’ घेणार प्रतिज्ञापत्र
मी ........ चा मुलगा ...... रहिवासी, वय.... वर्ष सध्या ........... येथे राहणार असून याद्वारे शपथेवर पुढीलप्रमाणे शपथ घेतो आणि घोषित करतो,
- मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सदस्य आहे आणि माझ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ..... पद जिल्हा आणि तेव्हापासून उपरोक्त पदावर आहे.
- माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संविधानावर पूर्ण विश्वास, निष्ठा आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री शरदचंद्र पवार यांच्या आदर्शावर आणि तत्वांवर माझी बिनशर्त निष्ठा ठेवतो. मी असेही सांगतो की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाला माझा मनापासून बिनशर्त अटळ पाठिंबा आहे.
- पक्षाच्या घटनेबाबत आणि मा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार यांच्यासोबत विश्वासघात करणाऱ्या अजित पवार आणि त्यांच्या सहकारी आमदारांच्या कारवायाचा मी निषेध करत आहे.
- मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री शरदचंद्र पवार साहेबांप्रती माझी पूर्ण निष्ठा आणि निष्ठेची पुनश्च: पुष्टी करतो आणि त्यांच्या अधिपत्याखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घटनेत नमूद केलेले उदिष्टे पूर्ण करण्यासाठी काम करीन
सत्यत्वस्थापन
...... २०२३ च्या या ...... दिवशी ....... रोजी सत्यापित, मी वर नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे सत्यापित करतो की, वरील प्रतिज्ञापत्रातील मजकूर खरा आणि बरोबर आहे. त्यातील कोणताही भाग खोटा नाही आणि त्यातून कोणतीही महत्त्वाची वस्तूस्थिती लपवण्यात आलेली नाही
सही