Ajit Pawar : मला विचार करायला दोन-तीन दिवस द्या; शरद पवारांनी कार्यकर्त्यांना पाठवला निरोप, एक अटही घातली!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 05:53 PM2023-05-02T17:53:51+5:302023-05-02T18:07:36+5:30
NCP Ajit Pawar : व्हाय.बी.चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. तसेच काही कार्यकर्ते उपोषणाला बसले. यानंतर आता अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे.
लोक माझे सांगाती या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथा पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईत झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते तसेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आले होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना अचानक शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यानंतर एकच गोंधळ उडाला. काही वेळाने शरद पवार निवासस्थानी गेले. यानंतर व्हाय.बी.चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. तसेच काही कार्यकर्ते उपोषणाला बसले. यानंतर आता अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे.
"तुमच्या सर्वांच्या आग्रहाखातर विचार करायला दोन ते तीन दिवस द्या" असं शरद पवारांनी म्हटलं आहे. अजित पवारांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना हा निरोप दिला आहे. "आजच्या कार्यक्रमासाठी सर्व कार्यकर्ते प्रेमापोटी आले होते. असं काही होईल हा सर्वांसाठीच शॉक होता. कार्यक्रमानंतर आम्ही सर्वजण सिल्व्हर ओकला गेलो. तुमच्या सर्वांच्या आग्रहाखातर विचार करायला दोन ते तीन दिवस द्या असं शरद पवारांनी म्हटलं आहे. माझ्यावर अवलंबून असतील तर माझं ऐकलंच पाहिजे असा पवार साहेबांचा निरोप आहे. हट्टीपणा बरोबर नाही. प्रत्येकाने आपापल्या घरी जावं" असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
Mumbai, Maharashtra | Sharad Pawar will take two to three days to rethink his decision (of stepping down as NCP chief), says NCP leader Ajit Pawar as he holds talks with protesting party workers pic.twitter.com/c6D1YSPI0n
— ANI (@ANI) May 2, 2023
"आज ११ वाजता आपला जो कार्यक्रम होता. साहेबांच्या प्रेमाखातर आले होते. कुणाच्याच लक्षात आलं नाही की असं काहीतरी पवारसाहेब बोलतील, तो शॉक होता... बराच वेळ आपल्या सहवासात थांबले. सिल्व्हर ओकला गेले. विद्या चव्हाण, वंदना चव्हाण, भुजबळ, वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड सिल्व्हर ओकला गेले. सगळ्या महाराष्ट्राची, कार्यकर्त्यांची इच्छा आहे."
"मला, रोहितला, भुजबळांना सांगितलं - सुप्रियांशी फोनवर बोलले की, मी माझा निर्णय दिला आहे. विचार करायला दोन ते दिवस लागतील... तेवढे द्या.... कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी जायचं... हट्टीपणा करताना कार्यकर्ता दिसला नाही पाहिजे.. बसलेला दिसला तर मी माझा निर्णय बदलणार नाही. महाराष्ट्रामध्ये जे राजीनामासत्र सुरू झालंय, ते थांबवलं गेलं पाहिजे. कुणीही राजीनामा देण्याचं कारण नाही."
"देशातून, राज्यातून फोन येत आहेत.. या सगळ्याचा विचार करण्याकरता दोन-तीन दिवस लागतील. भावनिक बोलले, अश्रू अनावर झाले, सगळ्यांनी आपापली भावना मांडली. या सगळ्या गोष्टी खूप गांभीर्याने घेतलेल्या आहेत. वडीलधाऱ्यांचं जसं ऐकतो तसं पवार साहेबांचं ऐका..." असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"