ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि सक्तवसुली संचालनालय छगन भुजबळांवर करत असेलली कारवाई काद्यानुसार असून त्याला सुडबुद्धी म्हणणं हा कांगावा असल्याचा आरोप भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ तसेच त्यांच्या कुटुंबियांवरील भ्रष्टाचारविरोधी कारवाई पूर्णपणे कायद्याला धरून आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन अखेर ईडी व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, असे भंडारी यांनी मंगळवारी सांगितले.
ते म्हणाले की, लोकांनी नाकारल्यामुळे कालचे सत्ताधारी आज विरोधी पक्षाचे नेते बनले तर त्यामुळे ते निष्पाप ठरत नाहीत. सत्तेवर असताना त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा जाब त्यांना द्यावाच लागेल. अशा कारवाईला राष्ट्रवादी काँग्रेसने सूडाने केलेली कारवाई म्हणणे हास्यास्पद आहे.
भांडारी म्हणाले की, भुजबळ व राष्ट्रवादी अन्य नेत्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात भाजपा २०११ - २०१२ पासून दाद मागत आहे. त्या संदर्भात पुरावे दिले व रितसर तक्रारी केल्या. कायद्याच्या चौकटीतील सर्व मार्ग अवलंबले. तथापि, काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेचा दुरुपयोग करून कारवाई रोखली. आता उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली संबंधित यंत्रणा स्पष्टपणे कायदेशीर कारवाई करत आहेत.
त्यांनी सांगितले की, काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा भ्रष्टाचार हा निवडणुकीचा मुद्दा होता. सत्तेवर आल्यानंतर या भ्रष्टाचारावर कारवाई करू असे स्पष्ट आश्वासन भाजपाने दिले होते. पक्षाच्या जाहीरनाम्यातही हा मुद्दा होता. जनतेने भाजपाची भूमिका मान्य करून पक्षाला मते दिली. त्यामुळे भुजबळ यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातील कारवाई ही जनादेशानुसारच आहे.
भांडारी म्हणाले की, भुजबळ यांच्या पुतण्यावरील सक्तवसुली संचालनालयाने केलेली कालची कारवाई हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या कारवाईबद्दल ईडीचे अभिनंदन करतो. यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. या दोन्ही यंत्रणा कायद्यानुसार कारवाई करत असताना त्याला राजकीय सूडबुद्धी म्हणणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आरोप हा कांगावा असून दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.