Ajit Pawar Vs Sharad Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होण्यास सुरुवात झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. यादृष्टीने अजित पवार यांनी प्रचारालाही सुरुवात केली असून मला एकटं पाडू नका, असं आवाहन ते बारामतीकरांना करत आहेत. मात्र त्याचवेळी विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांच्याकडून धमकावलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. याबाबत माझ्याकडे तक्रारी येत असल्याचं काही दिवसांपूर्वी पवार म्हणाले. शरद पवारांच्या या आरोपाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
"कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा शरद पवार साहेब यांनी केलेल्या आरोपास कसलाही आधार नसून राष्ट्रवादीची प्रतिमा मलीन करण्यासाठी त्यांनी हा आरोप केला आहे. हे आरोप राजकीय हेतून प्रेरित आहेत," असा पलटवार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उन्मेश पाटील यांनी केला आहे. तसंच याबाबत निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे.
रोहित पवारांनीही केला होता गंभीर आरोप
बारामतीत आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न अजित पवारांच्या पक्षातील लोक करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही केला होता. "अनेक वर्षांपासून पवार कुटुंबावर असलेल्या बारामतीकरांच्या प्रेमाच्या कर्जातून कधीही उतराई होता येणार नाही. पण याची जाणीव ठेवण्याऐवजी आज आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने कुणी बोललं किंवा सोशल मीडियात व्यक्त झालं तर त्याला नोकरीवरून काढण्याचा आणि त्याच्यावर दादागिरी करण्याचा उद्योग मलिदा गँग करत आहे. आजवर कधी असं घडलं नाही, पण विचारांच्या आणि निष्ठेच्या बाजूने असलेल्या लोकांचे रोजगार घालवले जात असतील तर अनेकांना राजकीय बेरोजगार करण्याची ताकदही याच बारामतीकरांमध्ये आहे, हे कुणाच्यातरी तालावर नाचणाऱ्या मलिदा गँगनेही लक्षात ठेवावं," असा इशारा रोहित पवारांनी दिला होता.