उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या आणि अन्य घडामोडींमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यावर शरद पवारांनी मोठी कारवाई केली आहे. काही वेळापूर्वीच सुप्रिया सुळे यांनी या दोघांवर लोकसभेत अपात्रतेची कारवाई सुरु करावी अशई शिफारस केली होती. त्यानंतर लगेचच पवारांनी मोठा निर्णय घेतला आहे.
शरद पवारांनी सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीतून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. पक्षविरोधी कारवाया केल्याने राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने पटेल आणि तटकरे यांची नावे वगळावीत असे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीने अजित पवारांच्या शपथसोहळ्याला उपस्थित असलेल्या पदाधिकारी, नेत्यांवर बडतर्फीची कारवाई सुरु केली आहे. आता खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यावर कारवाई अटळ असल्याचे समजते आहे. शपथविधीला राष्ट्रवादीचे तीन खासदार उपस्थित होते. यापैकी दोन खासदारांवर कारवाईचा प्रस्ताव पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांकडे केली आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी 2 जुलै 2023 रोजी पक्षाची घटना आणि नियमांचे थेट उल्लंघन केले आहे. यामुळे त्यांना बडतर्फ करून अपात्र करावे अशी मागणी सुळे यांनी केली आहे. तात्काळ कारवाई करून भारतीय राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेची याचिका सक्षम प्राधिकार्यासमोर दाखल करावी, असा प्रस्ताव सुळे यांनी शरद पवारांकडे मांडला आहे.