मुंबईः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मोदींनी एकत्र काम करण्याची ऑफर दिली होती, तसेच सुप्रिया सुळेंनाही मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यास मला आनंद होईल, असं मोदींनी सांगितलं होतं. एबीपी माझानं घेतलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दोन अटी अमान्य केल्याने महाराष्ट्रात भाजपाची सत्तास्थापनेची संधी हुकल्याची बातमी अनेक वृत्तवाहिन्यांनी दिली होती, त्यावरच शरद पवारांनी खुलासा केला. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्तास्थापनेसाठी भाजपासोबत जाण्यास तयारी होती, मात्र त्यांच्या दोन अटी होत्या. त्यासाठी भाजपा नेतृत्वाने नकार दिला होता, एकत्र सरकार स्थापन करणे शक्य झाले नसल्याचे वृत्त अनेक वृत्तवाहिन्यांनी दिले होते. त्यावरच शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. या सगळ्या घडामोडींवर पवारांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. मोदींनी एकत्र काम करण्याची ऑफर दिली होती. तुमच्यासोबत काम करण्यास मला मनापासून आनंद होईल, असं मोदींनी सांगितलं होतं. तसेच सुप्रिया सुळेंनाही मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यास मला आनंद होईल, असंही ते म्हणाले होते, पण मी त्यांना सांगितलं एकत्र काम करणं राजकीयदृष्ट्या मला शक्य नाही. मला भाजपानं राष्ट्रपतीपदाची ऑफर दिलेली नव्हती, हे काही खरं नाही, माझ्या मनातही तसं नव्हतं, असंही पवारांनी स्पष्ट केलेलं आहे. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आपल्या अटी सांगितल्या होत्या. यात केंद्रात सक्रिय असलेल्या आपल्या कन्या सुप्रिया सुळे यांना केंद्रीय कृषी मंत्रिपद द्यावे आणि राज्यातील नेतृत्व बदलावे. तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी नको, अशी मागणी केली होती. मात्र या दोन्ही मागण्यांसाठी भाजपाने नकार दिला होता, असं वृत्त अनेकांनी दिलं होतं. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आलं. त्याच पार्श्वभूमीवर पवारांनी केलेल्या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मोदींनी दिलेल्या 'त्या' ऑफरवर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 8:10 PM