जुलै महिन्यात अजित पवार यांनी बंडाचा झेंडा फडकवत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दिला होता. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येअजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले होते. मात्र आमच्या पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही, तर काही लोकांनी वेगळी भूमिका घेतलीय, असा दावा शरद पवारांसह अनेक नेत्यांकडून करण्यात येत होता. मात्र शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाने निवडणूक आयोगाकडे दिलेल्या उत्तरामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट स्पष्ट झाली आहे. तसेच शरद पवार यांनी अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केल्याने अजितदादांसह त्यांच्या सहकारी आमदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांच्या एका मोठ्या गटाने राज्य सरकारला पाठिंबा दिला होता. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तेव्हापासून पक्षावरील वर्चस्वासाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये चढाओढ सुरू आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणात आपण जनतेच्या कोर्टात न्याय मागणार, असा दावा शरद पवार यांच्याकडून करण्यात येत होता.
दरम्यान, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने राष्ट्रवादी काँग्रेसबाबत अजित पवार गटाकडून करण्यात आलेले दावे फेटाळून लावले आहेत. तसेच अजित पवार यांच्यासह शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेले ९ मंत्री आणि ३१ आमदार अशा एकूण ४० आमदारांची आमदारकी रद्द करण्यात यावी, यासाठी याचिका दाखल केली आहे. शरद पवार गटाकडून खेळण्यात आलेल्या या खेळीनंतर अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी आम्ही सर्व कायदेशीर बाबींची तपासणी करून शिंदे आणि महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असं विधान केलं आहे.