- ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 3 - शरद पवारांनी कधीच दलितांविरोधी भूमिका घेतली नाही. आजवर त्यांनी दलितांसाठी खूप काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या एखाद्या भूमिकेचा चुकीचा अर्थ काढून टीका करणे योग्य नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
ते म्हणाले की, शरद पवारांबद्दल मला आदर आहे. त्यांनी आजवर दलितांची बाजू घेतली आहे. त्यांची दलितांच्या मदतीची भूमिका आहे. या समाजाला त्यांनी आजवर मोठे पाठबळ दिले आहे. या गोष्टी आम्ही विसरू शकत नाही. कोपर्डीप्रश्नी त्यांनी कोणतेही चुकीचे वक्तव्य केलेले नाही. कायद्याचा दुरुपयोग होत असल्याच्या तक्रारी आपल्याही कानावर आहेत. त्या दूर करण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल. महाराष्ट्रातील काही नेत्यांकडून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चाही चुकीची आहे. मराठा समाजाने जागृत होऊन अत्याचाराविरोधात मोर्चे काढणे योग्यच आहे. या घटनेचा निषेध करून आरोपींना फाशीची मागणीही केली पाहिजे, मात्र अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करण्याची मागणी योग्य नाही. यापूर्वी कधीही दलितांवरील अत्याचाराच्या घटनेत आम्ही कोणत्याही समाजाविरोधात भूमिका घेतलेली नव्हती. आम्ही कोणालाही ‘टार्गेट’ केले नव्हते. त्यामुळे आता मराठा समाजाकडूनही तशी अपेक्षा आहे. मराठा समाजासह, ब्राह्मण, लिंगायत, मुस्लिम अशा घटकांना व अन्य राज्यातील समाजघटकांनाही २५ टक्क्यांमध्ये आरक्षण मिळावे, यासाठी मी प्रयत्न सुरू केले आहेत. २५ टक्क्यांमध्ये या सर्वांचा मेळ बसणे शक्य आहे. संसदेत आणि राज्यसभेत याविषयी निर्णय घेणे अपेक्षित आहे. काही बदलही करावे लागतील. ते करावेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मी लवकरच भेट घेणार आहे.