मुंबई - राजकारणात घट्ट मैत्री किंवा कट्टर शत्रुत्व असं काही नसतं, हे नेहमीच दिसून आलं आहे. जातीपातीवर राजकारण करण्यात येत असलं तरी सत्ता स्थापनेच्या वेळी जातीपातीला किंवा विचारधारेला काहीही महत्त्व उरत नाही. महाराष्ट्रातही त्याची प्रचिती येत आहे. राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. मात्र पवारांनी महाशिवआघाडीविषयी केलेलं वक्तव्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचं केलेलं कौतुक यामुळे पवारांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत देखील भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात शरद पवारांना लक्ष्य केले होते. तसेच राष्ट्रवादीचे 30 हून अधिक आमदार फोडून त्यांना भाजपमध्ये घेतले होते. त्यामुळे पवारांविषयी राज्यात सहानुभूती निर्माण झाली होती. त्यामुळे शरद पवार भाजपसोबत जाण्याच्या मनस्थितीत असतील तर त्यांना तरुणाईतून विरोध होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत पवारांचं राजकारण संपल्याचा दावा सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आला होता. त्यातच सातारा येथील पवारांची पावसातील सभा चांगलीच गाजली होती. त्यामुळे राज्यातील वातावरण एका रात्रीत फिरले होते. तरुणाईला पवारांची भुरळ पडली होती. याचा भाजपला सर्वाधिक फटका बसला. 123 जागा मिळवणारे भाजप यावेळी 104 वर आले आहे.
विधानसभा निवडणूक पवार विरुद्ध भाजप अशीच रंगली होती. मात्र आता पवारच सत्तेसाठी भाजपला पाठिंबा देणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या समर्थकांना आणि तरुणाईला ही बाब पचनी पडणे कठिण जात आहे. किंबहुना तरुणांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.