मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसमधील आर.आर आपल्या सगळ्यांनाच परिचित आहेत. शरद पवारांनी सामान्य कुटुंबातून आर.आर पाटलांना पुढे आणलं आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवलं. मात्र आता संघर्षाच्या परिस्थितीत पुन्हा एकदा R-R फॅक्टर शरद पवारांसाठी मैदानात उतरला आहे. यातील एक R म्हणजे रोहित पवार आणि दुसरे R म्हणजे रोहित पाटील.
सध्या आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी युवा नेते रोहित पाटील हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये शरद पवारांची स्वाभिमान सभा पार पडणार आहे. या सभेच्या तयारीसाठी दोन्ही रोहित बीडमध्ये आहेत. राज्यात शरद पवार अडचणीत असल्याचे चित्र दिसून येते त्यात रोहित पवार, रोहित पाटील यासारखी युवा नेते राष्ट्रवादीत पुढे येत आहेत. आमदार रोहित पवार म्हणाले की, शरद पवार अडचणीत नाहीत. महाराष्ट्रातला महाराष्ट्र धर्म, शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार अडचणीत आहे. आजही कार्यकर्ता शरद पवारांच्या पाठिशी आहे. जो विचार शरद पवारांनी जपला तो विचार पुढे घेऊन जाण्याचं काम कार्यकर्त्यांना करायचं आहे असं त्यांनी सांगितले.
तर आम्ही तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन मराठवाडा दौऱ्यावर आहोत. लोकांचा ज्यापद्धतीने प्रतिसाद मिळतोय, शरद पवारांनी जे काम केले, धोरणे आखली आहेत त्यानं इथली लोक शरद पवारांवर प्रेम करतात. शरद पवारांचे काम हे शाश्वत काम आहे. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. लोकं शरद पवारांच्या पाठीशी आहेत त्यामाध्यमातून आम्ही इथं काम करतोय असं रोहित पाटील यांनी म्हटलं.
अजित पवार-शरद पवार भेटीनं संभ्रम?
अजित पवार-शरद पवार भेटीने सामान्यांमध्ये संभ्रम नाही. शरद पवारांनी या भेटीवर स्पष्टीकरण दिले आहे. भाजपासोबत जाणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले आहे. कौटुंबिक भेट होऊ शकते. भेटीगाठीवर चर्चा करू नये. १७ तारखेला शरद पवारांची जी सभा आहे ती दिशादर्शक ठरेल असं आमदार रोहित पवार म्हणाले, तर ही भेट गुप्त नव्हती. गुप्त असती तर कुणाला कळाली नसती. आयटी पार्क भूमिपूजनानंतर ही भेट झाली. शरद पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. धर्मांश शक्तीविरोधात आम्ही लढणार आहोत त्यात आम्ही साथ देतोय. आम्ही महाराष्ट्र पिंजून काढू असं विधान रोहित पाटील यांनी केले.
पक्षाच्या युवक कार्यकारणीत ध्येय धोरणे बदलण्याची मागणी आहे. ज्यांनी युवक संघटनेत काम केले त्यांना मुख्य सघटनेत काम केले पाहिजे. शरद पवारांचा विचार लोकांपर्यंत पोहचवायचा आहे. हे करत असताना कुठल्याही पदाची आवश्यकता नसते. आम्ही दोघे कार्यकर्ते आहोत. युवक प्रदेशाध्यक्षपदासाठी जर रोहित पाटलांचे नाव पुढे आले तर आम्ही त्यांच्या पाठिशी उभे राहू असं आमदार रोहित पवार यांनी सांगितले.