पुणे : भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या गुरुवारी पुण्यात झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे व शरद पवार यांना लक्ष्य करण्यात आले. पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातील उद्धव ठाकरे यांच्याबद्दलच्या १० वाक्यांचे जाहीर वाचन करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांची खिल्ली उडवली, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाविकास आघाडीच्या काळात राज्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे सांगत सध्याच्या सरकारने अवघ्या ११ महिन्यांमध्ये चांगली कामगिरी बजावली असल्याची प्रशंसा केली.
‘शिल्लक सेना’ असा उल्लेख करत फडणवीस यांनी ठाकरेंना लक्ष्य केले. ‘वज्रमूठबद्दल काय बोलणार? वज्रमूठचा निर्माता असलेले शरद पवार त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात वज्रमूठचा चेहरा असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय म्हणतात पाहा, असे सांगून फडणवीस यांनी त्या पुस्तकातील १० वाक्येच वाचून दाखवली. त्यानंतर ते म्हणाले, ‘पवार म्हणाले, तेच आम्ही म्हणत होतो, तर आम्हाला महाराष्ट्रद्रोही ठरवले.’ ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या ८ मागण्याही फडणवीस यांनी वाचून दाखवल्या, प्रत्येक मागणीनंतर ते न्यायालयाने हे मान्य केले का, असा प्रश्न विचारून प्रेक्षागृहातील भाजप कार्यकर्त्यांकडून ‘नाही’ सामूहिकपणे म्हणून घेत होते. हे सरकार कार्यकाळ तर पूर्ण करेलच, शिवाय पुन्हा निवडून येईल, असा दावाही फडणवीस यांनी केला.
ठाकरेंनी पवारांचा क्लास लावावा मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो. माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल. मग माझा पक्षच ठराव करेल. मग मीच राजीनामा मागे घेईन आणि माझ्या जागी परत येईन. शरद पवारांनी ठाकरेंना आपल्या कृतीतून सांगितलं की, राजीनामा देतो म्हणणं आणि राजीनामा देणं यातला फरक काय आहे. टीआरपी कसा खेचावा यासाठी पवारांचा क्लास लावावा, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.
एक भाकरी फिरवणारा, दुसरा तुकडे मिळवणारा, तिसरा हिसकावणारा.... मविआची संभावना त्यांनी विश्वासघाताचे सरकार अशी केली. मविआतील एक पक्ष भाकरी फिरवणारा, दुसरा तुकडे मिळवणारा व तिसरा भाकरी हिसकावणारा, अशी कोटीही फडणवीस यांनी यावेळी केली.
जे बनायचे ते स्वतःच्या बळावर. दुसर्याचे बळ घेऊन बनलेला वाघ हा सर्कशीतला वाघ असतो. स्वबळावर बनलेला वाघ हा जंगलाचा राजा होऊ शकतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पवारांच्या पुस्तकातील फडणवीसांनी सांगितलेले १० मुद्दे- बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या संवादातील सहजता उद्धव ठाकरेंबाबत नव्हती.- उद्धव ठाकरेंना राज्यातील घडामोडींची बित्तंंबातमी नसे, जी मुख्यमंत्र्यांना असायला हवी होती.- उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत उद्रेक होईल, याची कल्पनाच आम्हाला नव्हती.- कुठे काय घडतंय, याच्याकडे त्यांचं बारीक लक्ष नसे.- उद्या काय होईल याचा अंदाज घ्यायची क्षमता नव्हती. त्यानुसार काय पावले उचलायची, याचं राजकीय चातुर्य असायला हवं होतं, ते नव्हतं.- त्यांना अनुभव नसल्याने हे सगळं घडत होतं. ते टाळता येणं त्यांना जमलं नाही.- महाविकास आघाडीचं सरकार कोसळत असताना त्यांनी संघर्ष न करता पहिल्याच टप्प्यात माघार घेतली.- उद्धव ठाकरे प्रशासनाच्या संपर्कात होते. परंतु, ऑनलाइन पद्धतीने.- दुसरीकडे राजेश टोपे, अजित पवार आणि इतर मंत्री प्रत्यक्ष प्रशासनाच्या संपर्कात होते.- उद्धव ठाकरेंचे फक्त दोन वेळा मंत्रालयात जाणे, हे आमच्या पचनी पडले नव्हते.