शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ: अजित पवारांनी केला काकांना फोन; काय संभाषण झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:02 IST2025-01-27T12:00:01+5:302025-01-27T12:02:17+5:30

Sharad Pawar Health: अजित पवार यांनी फोन करून शरद पवारांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे.

Sharad Pawars health is unwell Ajit Pawar called his uncle | शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ: अजित पवारांनी केला काकांना फोन; काय संभाषण झालं?

शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ: अजित पवारांनी केला काकांना फोन; काय संभाषण झालं?

NCP Ajit Pawar: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मागील काही दिवसांपासून प्रकृती बिघडली आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील कार्यक्रमादरम्यान भाषणात त्यांना वारंवार खोकल्याचा त्रास होत असल्याचे दिसून आले होते. मात्र तरीही ते पुण्यातून कोल्हापूरच्या दौऱ्यावर गेले. तिथं नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर पवार यांची प्रकृती आणखीनच बिघडली. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला असून पवार सध्या मुंबईत आहेत. शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतची माहिती मिळताच त्यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करून विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवार यांनी काल शरद पवार यांना फोन करत त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. तसंच पूर्णपणे बरं वाटेपर्यंत विश्रांती घ्यावी, अशी विनंतीही अजित पवारांनी काकांना केल्याचे समजते.

दरम्यान, राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबात संघर्ष निर्माण झाला होता. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर कुटुंबातील तणावाचं वातावरण निवळण्यास सुरुवात झाली असून कुटुंबातील विविध सदस्य सार्वजनिक कार्यक्रमांनिमित्त एका व्यासपीठावर येत असल्याचं दिसत आहे. त्यातच आता शरद पवार यांच्या आजारपणात अजित पवार यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याने राजकीय वाटा वेगळ्या झालेलं हे कुटुंब पुन्हा एकत्र येणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

शरद पवारांचे नियोजित कार्यक्रम रद्द

शरद पवार यांचे पुढील काही दिवसांतील सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पवार यांना खोकल्यामुळे बोलण्यात त्रास होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. “खोकल्यामुळे बोलण्यात अडचण होत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पवार साहेबांनी चार दिवस सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे,” असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. 
 
 

Web Title: Sharad Pawars health is unwell Ajit Pawar called his uncle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.