नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नांदेडमध्ये रविवारी रात्री सर्वपक्षीय सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या रंगलेल्या सन्मान सोहळ्यात शेकापचे ९५ वर्षीय ज्येष्ठ नेते भाई डॉ. केशवराव धोंडगे यांनी सर्वांनाच हसवित आत्मचिंतनही करायला लावले.एमजीएममध्ये झालेल्या या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री कमलकिशोर कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी भाई डॉ. धोंडगे होते. ‘शरद पवार यांची बारामती म्हणजे भानामती आहे. ते, माणसे फोडण्यात कुशल आहेत, कुणाच्या घरातील माणूस केव्हा फोडतील, याचा पत्ता लागू देत नाहीत,’ असे सांगत भाई धोंडगे यांनी शरद पवार यांना ‘विना-चिपळ्याचे नारद,’ असे संबोधले.एकीकडे उपरोधिक बोलत असतानाच डॉ. धोंडगे यांनी पवारांचे जोरदार कौतुकही केले. राज्याच्या हिताचे निर्णय घेणारे ते धुरीण आहेत. संसदीय कामातील कोहिनूर आहेत. त्यांना आता राष्ट्रपती करावे. मराठवाड्याच्या विकासावर भाष्य करताना भाई धोंडगे म्हणाले, विधिमंडळाचे अधिवेशन औरंगाबादला व्हावे, अशी मागणी होती. परंतु, शरद पवार यांनीही फिरवाफिरवी केली. अजूनही मराठवाड्यावर अन्याय सुरूच आहे. आता तरी ही मालिका खंडित करा. या वेळी पवार यांनीही भाई धोंडगे यांचा गौरव केला. आणीबाणीच्या मुद्द्यावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या प्रस्तावाला डॉ. धोंडगे यांनी सत्ता पक्षात असतानाही विरोध केला. लोकांनी निवडून दिलेल्या उमेदवाराविरुद्ध प्रस्ताव आणण्याची कृती लोकशाहीविरोधी असल्याची भूमिका भाई धोंडगे यांनी मांडली. त्यांनी ठरावाच्या विरोधात मतदानही केले. यावरून धोंडगे यांची लोकशाहीनिष्ठा प्रकट होते. या वेळी खा. अशोक चव्हाण म्हणाले, शरद पवारांनी राज्याला हरित क्रांतीकडे नेले. मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद भूकंपातील त्यांनी केलेले काम जवळून पाहिले. लोकहितासाठी त्यांचा कायम पुढाकार राहिला. (प्रतिनिधी)>भाई धोंडगेंचा मायेचा मुकासोहळ्याच्या प्रारंभी भाई धोंडगे यांनी प्रेमाने आलिंगन देत वडीलकीच्या नात्याने शरद पवार यांचा मायेचा मुकाही घेतला. त्या वेळी उपस्थितांमधील हास्यविनोदाकडे लक्ष वेधत पवारांनीही भाई धोंडगे यांचे हे कौतुक आनंदाने स्वीकारले. ते मिश्कीलपणे म्हणाले, बरे झाले, जाहीर कार्यक्रमातच मुका घेतला. मला घरी सांगता येईल, ते केशवराव धोंडगे होते. अन्यथा पंचाईतच व्हायची.
शरद पवारांचा सन्मान
By admin | Published: February 28, 2017 4:39 AM