पुणे :सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. एखादी घटना माध्यमांपर्यंत पोचण्याच्या आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची सत्यता न तपासात व्हायरल होण्याचे प्रसंगही अनेकदा बघायला मिळाले आहेत. असाच अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबतीत आला असून विकिपीडियावर त्यांची ओळख ही ''सर्वाधिक भ्रष्टाचारी राजकारणी'' अशी लिहिल्याचे समोर आले आहे. विकिपिडियावरील माहिती कोणत्याही व्यक्तीला विशेष परवानगी न घेता बदलता येत असल्यामुळे हा प्रकार कोणी केला हे अद्याप तरी समोर आलेले नाही.
आगामी निवडणुकांमध्ये सोशल मीडिया मोठी भूमिका बजावत आहेत. अनेकांनी तर प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात फेसबुक आणि वोट्सऍपचा वापर सुरु केल्याने त्यावरही लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने दिली होती. मात्र या माध्यमातून फक्त प्रसिद्धीचं नव्हे तर बदनामी करण्याचेही प्रयत्न दिसून आले असल्याने हे दुधारी शस्त्र मानण्यात येते. अगदी काही दिवसांपूर्वीच रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याबाबतही असाच अनुभव आला असून त्यांची माहिती सलग तीन दिवस तीन वेगवेगळ्या पक्षाचे नेते म्हणून बदलण्यात आली. एकूणच सोशल मीडियाचा असा वापर निवडणुका संपेपर्यंत कोणत्या थराला जाईल हे आत्तातरी सांगणे कठीण झाले आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने गांभीर्याने घेतला आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष चेतन तुपे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, हा प्रकार अतिशय गंभीर आहे. याबाबत कायदेशीर कारवाई करणार आहोत. पवार यांची कोणत्याही प्रकारे बदनामी होत नाही म्हटल्यावर अशी असभ्य भाषा वापरण्यात आली आहे. महिला शहराध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी हे अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण असून आम्ही आरोपीला धडा शिकवू असे नमूद केले. उद्याच याबाबत तक्रार दाखल करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.