नवी मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची नेरुळमधील सभा पुन्हा पावसामुळे गाजली. भर पावसात दोन मिनिटांच्या भाषणामध्ये पवार यांनी निराशा हा विषय मनामध्ये आणू नका. निराशेवर मात करून संघर्ष करून धैर्याने पुढे जाऊ, असे आवाहन रविवारी कार्यकर्त्यांना केले.
नवी मुंबईतील नेरूळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कार्यकर्ता व महिला बचत गटांचा मेळावा आयोजित केला होता. शरद पवार सभेच्या ठिकाणी येताच मुसळधार पाऊस सुरू झाला. स्वागत समारंभ टाळून त्यांनी माइक ताब्यात घेतला. ते म्हणाले, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. या संविधानाचा सन्मान देशामध्ये केला जातो. परिस्थितीवर मात करून व निसर्गाची साथ असो किंवा नसो डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांनी देशाच्या ऐक्यासाठी काम केले.
महिला कार्यकर्त्यांनी परिश्रम करून बचतगटाचा मेळावा आयोजित केला होता. पावसामुळे त्या निराश झाल्या होत्या. शरद पवार यांनी त्यांना धीर दिला. आपण निराश व्हायचे नाही, असे त्यांनी बचतगटाच्या महिलांना सांगितले. सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे भर पावसात जाहीर सभा घेतली आणि निवडणुकीचा नूर पालटला होता. त्याचीच पुनरावृत्ती रविवारी नेरूळ येथे झाली, पक्षात दोन गट पडलेले असताना ते राज्यभर सभा घेत फिरत आहेत. नेरूळ येथे शरद पवार सभेच्या ठिकाणी पोहोचताच पाऊस सुरू झाला. तेव्हा भर पावसात त्यांनी भाषण केले. सभेला महिलांनी मोठी गर्दी केली होती.
निराशेचा विचार आपल्या मनात येता कामा नये. निराशेवर मात करून संघर्ष करून धैयनि पुढे जाऊ, पुन्हा नव्या जोमाने कामाला लागा. - शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
साताऱ्यातील सभेची चर्चा■ मुसळधार पावसामुळे उपस्थित हजारो नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शरद पवार यांनी स्वागताची औपचारिकता न करता थेट भाषण सुरू केले व दोन मिनिटांत मार्गदर्शन करून सभा संपविली.■ त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी सातारा येथे भर पावसात झालेल्या सभेशी नेरुळमधील सभेची तुलना समाजमाध्यमांवर सुरू झाली आहे.■ यावेळी माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड, रोहिणी खडसे, मेहबूब शेख, सुलक्षणा सलगर, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सलुजा सुतार, नवी मुंबई कार्याध्यक्ष जी. एस. पाटील, युवक जिल्हाध्यक्ष किशोर आंग्रे, प्रशांत पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
महिलांनी डोक्यावर घेतल्या खुर्च्याशरद पवार यांचे भाषण ऐकण्यासाठी महिला मोठ्या संख्येने सभेला आल्या होत्या. मुसळधार पाऊस सुरू होताच बसण्यासाठीच्या खुर्च्छा डोक्यावर घेऊन महिलांनी शरद पवार यांचे भाषण ऐकले. पावसाचे वातावरण असताना व पाऊस सुरू झाल्यानंतरही कार्यकर्ते सभेच्या ठिकाणावरून हलले नव्हते.