पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले लिखाण आणि व्याख्यानांवर टीका केली आहे. बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं आणि लिखाणाएवढा अन्याय शिवछत्रपतींवर इतर कुणी केलेला नाही, असं माझं मत आहे, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे. काही इतिहासकारांनी शिवचरित्राबाबत अर्धवट तर काहींनी धाधांत खोटी माहिती दिली. मात्र श्रीमंत कोकाटे यांच्यासारख्या इतिहासकारांनी मेहनतीने खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला, असे कौतुकौद्गारही शरद पवार यांनी काढले.
श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेल्या शिवचरित्र आणि विचार प्रवाह या पुस्तकाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. या प्रकाशन सोहळ्याला छत्रपती शाहू महाराज तसेच माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार यांनी आपलं मत मांडलं. बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं आणि लिखाणाएवढा अन्याय शिवछत्रपतींवर अन्य कुणी केलेला नाही, असं माझं मतं आहे.
अनेक गोष्टी आहेत, ज्यांच्या खोलामध्ये मी जाऊ इच्छित नाही. त्या गोष्टी खऱ्या असल्या तरी त्या अनेकांना पटणाऱ्या नाहीत. मात्र श्रीमंत कोकाटे यांनी हे काम अगदी चांगल्या पद्धतीने केलं आहे. शिवछत्रपतींचं चित्र काही जणांनी धर्मांध आणि संकुचित पद्धतीने रंगवण्याचा प्रयत्न केला. मात्र श्रीमंत कोकाटे यांनी सत्य मांडलं आहे. तसेच अशाच प्रकारचं काम गोविंद पानसरे यांनी केलं आहे, असे शरद पवार म्हणाले.
काही इतिहासकारांनी शिवचरित्राबाबत अर्धवट तर काहींनी धाधांत खोटी माहिती दिली. मात्र कोकाटेंनी मेहनतीने खरा इतिहास मांडला. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे इतरांपेक्षा वेगळं होतं. कारण त्यांचं राज्य हे भोसल्यांचं राज्य झालं नाही, तर ते रयतेचं राज्य म्हणून ओळखलं गेलं, असेही शरद पवार म्हणाले.