नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, लोकसभेचे दिवंगत अध्यक्ष पी. ए. संगमा, भाजपाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आणि मध्य प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा या चार राजकीय नेत्यांसह सात मान्यवरांना यंदाचा ‘पद्मविभूषण’ हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान बुधवारी जाहीर झाला. ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी बहुमान कोणालाही जाहीर झाला नाही.‘पद्मविभूषण’च्या इतर मानकऱ्यांमध्ये मल्याळी गायक येसुदास (केरळ), आध्यात्मिक गुरू जग्गी महाराज (तामिळनाडू) व ज्येष्ठ वैज्ञानिक-अभियंते प्रा. उडीपी रामचंद्र राव यांचा समावेश आहे. ‘पद्मभूषण’च्या सात मानकऱ्यांमध्ये रुद्रविणावादक पं. विश्वमोहन भट (संगीत), देवी प्रसाद द्विवेदी (साहित्य-शिक्षण), डॉ. थेम्टन उदवाडिया (वैद्यकीय सेवा, महाराष्ट्र), आचार्य विजयरत्न सुंदर सुरिश्वर म.सा. (आध्यात्म), स्वामी निरंजनानंद सरस्वती (योगविद्या), राजकन्या महा चक्री सिरिनधोर्न (शिक्षण, थायलंड) आणि चो रामस्वामी (पत्रकारिता, मरणोत्तर) यांचा समावेश आहे. एकूण ८९ ‘पद्म’ मानकऱ्यांमध्ये आठ महाराष्ट्रातील आहेत. त्यात प्रत्येकी एक पद्मविभूषण व पद्मभूषण तर पाच पद्मश्री आहेत. शरद पवार व डॉ. उदवाडिया यांच्याखेरीज कैलाश खेर (गायन), अनुराधा पौडवाल (गायन), भावना सोमय्या (पत्रकारिता), शेफ संजीव कपूर (पाककला), निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी (समाजसेवा) आणि डॉ. मापुसकर (समाजसेवा, मरणोत्तर) हे राज्यातील ‘पद्मश्री’चे मानकरी आहेत. मूळ महाराष्ट्रीय, पण अन्य राज्यांत काम करणाऱ्या डॉ. मदन माधव गोडबोले (उत्तर प्रदेश, वैद्यकीय सेवा) व कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्ष निवेदिता रघुनाथ भिडे (तमिळनाडू, समाजसेवा) यांनाही ‘पद्मश्री’ जाहीर झाले. यंदा भारतरत्न नाही यंदा कोणालाच ‘भारतरत्न’ जाहीर झालेले नाही. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी दिवंगत जे. जयललिता यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी पंतप्रधान मोदी यांना भेटून केली होती. हा सन्मान शेतकऱ्यांना अर्पण करतो : पवारसार्वजनिक जीवनातील कार्यासाठी पद्मविभूषण सन्मान मिळाल्याबद्दल माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी आभार मानले आहेत. अन्नधान्य उत्पादनात देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना मी हा सन्मान अर्पण करतो, असे पवार यांनी म्हटले आहे. (सप्टेंबर १९९३ च्या भूकंपाच्या काळात) उस्मानाबाद व लातूरच्या जनतेने आणि (मार्च १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांच्या वेळी) मुंबईकरांनी हार न मानता संकटांचा जो सामना केला, त्यांचे मी आभार मानतो, असे नमूद करून शरद पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सरकारी यंत्रणेने त्यावेळी जे अथक प्रयत्न केले, त्यांचाही उल्लेख करायला हवा.
शरद पवार यांना ‘पद्मविभूषण’
By admin | Published: January 26, 2017 5:20 AM