ठरलं! शरद पवारांच्या पक्षाचं नाव अन् चिन्ह 'हे' असणार?; ४ वाजेपर्यंत समोर येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 01:07 PM2024-02-07T13:07:33+5:302024-02-07T13:08:42+5:30
. दुपारी ४ पर्यंत शरद पवारांच्या नव्या पक्षाचे नाव आणि चिन्ह आयोगाला कळवायचे आहे. त्यानुसार दिल्लीत वेगाने चक्र फिरत आहेत.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह हे अजित पवार गटाला देण्याचा निर्णय झाल्यानंतर आता शरद पवारांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह काय असेल याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. निवडणूक आयोगाने ७ फेब्रुवारीला दुपारी ४ पर्यंत शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह यांचा पर्याय सूचवण्याची मुदत दिली आहे. नाहीतर आगामी राज्यसभा निवडणुकीत शरद पवार गटाला अपक्ष दर्जा दिला जाईल असं सांगितले जात आहे. त्यामुळे शरद पवार गट विविध नाव आणि चिन्ह यावर चाचपणी करून मुदतीपूर्व निवडणूक आयोगाकडे अर्ज सादर करण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाकडून ज्या ३-४ नावांवर प्रामुख्याने विचार सुरू आहे त्यात पक्षाच्या नावामध्ये शरद पवार हे नाव असावं अशी कार्यकर्त्यांसह नेत्यांची मागणी आहे.
त्यात सूत्रांनुसार पक्षाचे नाव राष्ट्रवादी शरद पवार आणि चिन्ह वटवृक्ष घेणार असल्याचं पुढे आले आहे. दिल्लीच्या शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी नेत्यांची बैठक सुरू आहे. त्या बैठकीत पक्षाचं नवीन नाव आणि चिन्ह यावर चर्चा सुरू आहे. निवडणूक आयोगाला ३ पर्याय देणार आहेत. त्यातील एक वटवृक्ष असल्याचं पुढे आले आहे. विविध कायदेतज्ज्ञांसोबतही शरद पवार गटाच्या नेत्यांची चर्चा आहे. शरद पवार यांना राजकारणात आधारवड म्हटलं जाते. त्याच आधारवडच्या पार्श्वभूमीवर वटवृक्ष चिन्ह पर्याय म्हणून पुढे आले आहे. मात्र निवडणूक आयोग शरद पवार गटाला कोणते चिन्ह आणि नाव देतंय हे पाहणे गरजेचे आहे. दुपारी ४ पर्यंत शरद पवारांच्या नव्या पक्षाचे नाव आणि चिन्ह आयोगाला कळवायचे आहे. त्यानुसार दिल्लीत वेगाने चक्र फिरत आहेत.
...तरी शरद पवार कुठे आहेत?
एका अदृष्य शक्तीने दिलेला हा निर्णय आहे. ज्या व्यक्तीने पक्ष काढला, त्याच्या हातातून पक्ष काढून घेण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. तुमचे घर गावी असेल, ते वडिलांचे आहे, तुम्ही त्यांना बाहेर काढणार का, असा सवाल करत सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर भाष्य केले. आमदारांच्या संख्येवरून निकाल दिल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या संख्येवरून पक्ष कोणाचा हे ठरविता येणार नाही, असा एक निकाल दिलेला आहे. यामुळे आयोगाच्या या निकालाविरोधात आम्ही सर्वोच्च न्य़ायालयात जाणार असल्याचे सुळे म्हणाल्या.