पुणे : कोरोनाच्या संकटात ६५ वर्षांपुढील ज्येष्ठांनी शक्यतो घराबाहेर पडूच नये, अशी सरकारची मार्गदर्शक सूचना आहे. ऐंशीच्या घरात असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा मात्र पूर्वीच्याच उत्साहाने सर्वत्र संचार चालू आहे. यामागचे गुपित स्वत: पवार यानीच उलगडले. त्यांनी सांगितले, ‘‘सीरममध्ये प्रतिकारशक्ती वाढविणारी ‘बीसीजी’ लस तयार होते. मी हीच प्रतिकारशक्ती वाढवणारी लस घेतलेली आहे. आत्ता तीच लस घेऊन आलो आहे. कोरोनावरची नव्हे.’’
सीरम इन्स्टिट्यूट या जगातली सर्वात मोठ्या लस उत्पादक कंपनीचे संस्थापक सायरस पुनावाला हे शरद पवारांचे कॉलेजातले दोस्त. पुनावाला यांच्याच कंपनीला इंग्लंडमधल्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधित कोरोनावरील लशीच्या उत्पादनाचे हक्क मिळालेत. याबाबत पवार म्हणाले, ‘‘तुम्ही (पत्रकार) लोक माझ्याबद्दल अनेक गोष्टी उठवत असता. मी जिथे जाईल तिथे मी कोरोनावरची लस घेतली की काय, अशी चर्चा होते. लोकांना वाटते की सीरमचे प्रमुख हे पवारांचे वर्गमित्र असल्याने त्यांनी ती लस घेतली असेल. मी व माझ्या स्टाफने घेतलेली लस प्रतिकारशक्ती वाढवणारी आहे.’’ पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वीच एका वेबिनारमध्ये ‘बीसीजीची लस घेतल्याने प्रतिकारक्षमता वाढते, मी ती घेतली आहे,’’ असे सांगितले होते.
‘बीसीजी लशीमुळे प्रतिकारक्षमता वाढते.... मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शुक्रवारी (दि. २) बैठकीसाठी येण्यापूर्वी पवारांनी तेथून जवळच असलेल्या ‘सीरम’ला भेट दिली होती. व्हीएसआयमधील बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबद्दलची माहिती दिली. दरम्यान, ‘बीसीजी लशीमुळे प्रतिकारक्षमता वाढत असल्याने काही दिवसांपूर्वीच मी ती घेतली,’ असे स्वत: सायरस पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या वेबिनारमध्ये सांगितले होते. त्यामुळे पवार यांनीही हीच लस घेतली असावी, अशी शक्यता आहे.