मुंबई - भाकरी फिरवावी लागते, ती फिरवली नाही की करपते, असे विधान काही दिवसांपूर्वी करणाऱ्या शरद पवारांनी मंगळवारी राज्याच्या राजकारणात एक मोठा धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेसची १९९९ साली स्थापना झाल्यापासून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या पवारांनी मंगळवारी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली, तसेच यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचेही पवारांनी जाहीर केले आहे.
शरद पवारांच्या ‘लोक माझे सांगती...’ या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संपन्न झाले. या प्रकाशन सोहळ्यात केलेल्या भाषणातच पवारांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली. मात्र, सार्वजनिक जीवनात आपण कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पवारांच्या या धक्क्याने पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ असून, पवारांच्या या घोषणेनंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे उपस्थित असलेले नेते आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. पवारांचे भाषण संपल्यानंतर नेत्या, कार्यकर्त्यांनी पवारांना अक्षरशः घेराव घातला. जोपर्यंत पवार आपला निर्णय बदलत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशी भूमिका अनेकांनी घेतली. पवारांच्या समोरच जवळपास पावणेदोन तास हे नाट्य सुरू होते. यावेळी पवारांबरोबर त्यांच्या पत्नी प्रतिभा पवारही स्टेजवर उपस्थित होत्या.
अखेर प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना विनंती केल्यानंतर शरद पवार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधून बाहेर पडू शकले. आम्ही शरद पवारांशी चर्चा करून त्यांचे मन वळवतो आणि तुम्हाला हवा तसा निर्णय होईल, असा दिलासा यावेळी या नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिला. मात्र, पवार गेल्यानंतर युवक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पायऱ्यांवर उपोषणाला बसले. पवारांनी निर्णय मागे घ्यावा, अशी घोषणाबाजी हे कार्यकर्ते करत होते. दुसरीकडे शरद पवार आपल्या सिल्व्हर ओक निवासस्थानी गेल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, राजेश टोपे, रोहित पवार, अशोक पवार, शेखर निकम या सर्व नेत्यांनी निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतली.
आता पुढे काय?शक्यता १ : कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भावनांचा विचार करून पवार आपला निर्णय मागे घेऊ शकतात. शक्यता २ : शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर राष्ट्रवादीला नवा अध्यक्ष शोधावा लागेल. त्यासाठी एक समिती गठित केलेली आहेच. ही समिती निर्णय घेईल. अध्यक्षपदासाठी चार नावे चर्चेत आहेत. शक्यता ३ : शरद पवार यांच्याकडे अध्यक्षपद कायम ठेवून पक्ष चालवण्यासाठी कार्यकारी अध्यक्ष निवडला जाईल. पवारांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करतील.
अजित पवारांना होती कल्पना?शरद पवार आपल्या राजीनाम्याची घोषणा महाराष्ट्रदिनी म्हणजे १ मे रोजीच करणार होते. मात्र, महाविकास आघाडीची त्यादिवशी सभा होती, त्यामुळे मी त्यांना विनंती केली, की आज निर्णय घेतला तर माध्यमात तेच सुरू राहील आणि सभा बाजूला राहील, असे अजित पवार यावेळी म्हणाले. त्यामुळे पवारांच्या राजीनाम्याची अजित पवार सोडून पक्षातील बड्या नेत्यांनाही कल्पना नव्हती. हे स्पष्ट झाले आहे. पवारांच्या या निर्णयाबद्दल कुटुंबात चर्चा झाली होती, त्यात अजित पवारही होते, त्यामुळेच त्यांना याची कल्पना होती, असे समजते.