आवाजाचा करिष्मा : मोठ्या आजारातून बरे केल, ‘स्वरोपचारा’चे गुपित उघड झालेमुंबई : रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या आशातार्इंची गाणी आपणास मंत्रमुग्ध करतातच, पण त्यांच्या जादुई आवाजाचा करिष्मा असा की, तो आवाज ऐकून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एका मोठ्या आजारातून बरे झाले. दस्तुरखुद्द आशा भोसले यांनीच या ‘स्वरोपचारा’चे गुपित उघड केले!वानखेडे स्टेडियममध्ये शरद पवार आणि आशा भोसले यांच्या मेणाच्या पुतळ्यांचे अनवारण बुधवारी झाले. हे दोन्ही पुतळे सुनील कंडलूर यांनी बनवले असून त्यांचे लोणावळ्यात वॅक्स म्युझियम आहे. पैसा, वस्तू यातून जे सुख माणसाला मिळत नाही ते सुख स्वरातून मिळते, असा सूर पकडून आशाताई म्हणाल्या, शरद पवारांनी त्यांच्याबरोबर माझाही पुतळा बनवायचे फर्मान सोडल्यामुळे पुतळाबद्ध झालेली देशातील मी पहिली गायिका बनली आहे. . हा पुतळा बनवण्यासाठी माझ्या शरीराची अनेक मोजमापे घेण्यात आली. त्यामुळे मला माझी उंची कळली, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली. एक भावोत्कट आठवणही आशातार्इंनी सांगितली. त्या म्हणाल्या, शरद पवार हे कर्करोगाशी झुंज देत असताना त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर मी त्यांना भेटायला गेले होते. त्यावेळी ते माझी गाणी ऐकत होते. ‘तुमची गाणी मला धीर देतात’ असे त्यावेळी पवार मला म्हणाले. महागड्या उपचारांनी जे होऊ शकत नाही ते आपल्या स्वरांनी झाले, हे ऐकून गायिका असल्याचा अभिमान वाटला, असे उद्गार आशातार्इंनी काढताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.चांदण्यात फिरताना...आशातार्इंनी एक गाणे गावे, अशी फर्माईश शरद पवार यांनी केली; मात्र आशातार्इंनी विनम्र नकार दिला. पवारांनी खूपच आग्रह केल्यानंतर ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात’ या गाण्याचा मुखडा गाऊन दाखवला. (विशेष प्रतिनिधी)
शरद पवारांना आशातार्इंची ‘मात्रा’ लागू!
By admin | Published: April 16, 2015 1:18 AM