लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी खासदार शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली आहे. सचिवपदी अहमदनगर येथील राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कऱ्हाळे यांची निवड झाली. चेअरमन पदावर डॉ. अनिल पाटील यांना कायम ठेवण्यात आले आहे.संस्थेची सर्वसाधारण सभा मंगळवारी साताऱ्यातील मुख्यालयात झाली. या सभेत हा निर्णय घेण्यात आला. उपाध्यक्षपदी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार गणपतराव देशमुख, शंकरराव कोल्हे, जयश्रीताई चौगुले, एस. एम. पाटील, गोपीकिसन पाटील, अरुण कडू-पाटील या सहा जणांना संधी देण्यात आली. उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिवपदी कोरेगाव येथील डी. पी. भोसले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत यांची तर आष्टा येथील महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास महाडिक यांची माध्यमिक विभागाच्या सहसचिवपदी निवड करण्यात आली.मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य म्हणून डॉ. अनिल पाटील, अॅड. रवींद्र पवार, डॉ. एन. डी. पाटील, डॉ. पतंगराव कदम, आबासाहेब देशमुख, आमदार अजित पवार, अॅड. भगीरथ शिंदे, मीनाताई जगधनी, रामशेठ ठाकूर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तर माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, राजेंद्र फाळके, बबनराव पाचपुते, यांनाही संधी देण्यात आली आहे.
अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड
By admin | Published: May 10, 2017 2:30 AM