शरद पवारांची निवृत्तीची घोषणा अन् कार्यकर्त्यांचा गोंधळ; अजित पवार म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 02:17 PM2023-05-02T14:17:20+5:302023-05-02T14:18:01+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या अध्यक्षपदासाठी एक समिती स्थापन करणार असून नवीन समिती अध्यक्षपदाचा निर्णय घेईल, असेही शरद पवार म्हणाले.
मुंबई : मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये 'लोक माझा सांगाती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली. या प्रकाशन सोहळ्यामध्ये भाषण करताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे. यापुढे मी तीनच वर्ष राजकारणात राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या अध्यक्षपदासाठी एक समिती स्थापन करणार असून नवीन समिती अध्यक्षपदाचा निर्णय घेईल, असेही शरद पवार म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची आणि निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केल्यानंतर सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. "साहेब तुम्ही अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय मागे घ्या" अशी विनंती करत कार्यकर्त्यांनी मोठ्यामोठ्याने घोषणा दिल्या. या सर्व गोंधळानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी अध्यक्षपदाच्या निवृत्तीसंदर्भात समिती जो काही निर्णय घेईल तो शरद पवार यांना मान्य असेल, त्यामुळे तुम्ही आता गोंधळ करू नका, असे अवाहन अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.
याचबरोबर, "नवीन समितीमध्ये राष्ट्रवादीचेच नेते, सदस्य असणार आहे. त्यामध्ये मी, सुप्रिया सुळे या सुद्धा असतील, तुम्ही जी काही भावनिक साद साहेबांना घातली आहे, ती साहेबांच्या लक्षात आली आहे. त्यानुसार समिती योग्य ते निर्णय घेईल", असे अजित पवार म्हणाले. दरम्यान, या समितीमध्ये कोण सदस्य असतील याची संभाव्य नावेही शरद पवार यांनी आपल्या भाषणातच जाहीर केली. तसेच, यावेळी बोलताना शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्या.
शरद पवारांनी सुचवलेल्या समितीतील संभाव्य नावे
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन या संभाव्य लोकांचा समावेश करण्याची सूचना शरद पवार यांनी केली आहे. या नेत्यांची समिती अध्यक्षपदाच्या निवडीचा निर्णय घेईल. त्यासोबतच पक्ष संघटना वाढीसाठी आणि पक्षाची विचारधारा, ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी, जनसेवेसाठी सातत्याने प्रयत्न करतील असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.