राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यातच, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यासोबत आघाडी टिकावी यासाठी पक्षाने कमी जागांवर निवडणूक लढवली. मात्र विधानसभेला चित्र वेगळे असेल, असे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष प्रशांत जगपात यांनी म्हटले होते. यावर आता, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. अद्याप जागावाटपासंदर्भात चर्चाही सुरू झालेली नाही. सर्वांचा वाटा बरोबरीचा आहे. कोण किती जागा लढवेल, हे कोण कुठे जिंकेल यावर अवलंबून आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राऊत म्हणाले, "अद्याप जागावाटपासंदर्भात चर्चाही सुरू झालेली नाही. ना एनसीपी सोबत ना काँग्रेससोबत. त्यामुळे कोण किती जागा लढणार हा प्रश्नच येत नाही. सर्वांचा वाटा बरोबरीचा आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीने एकत्रितपणे निवडणूक लढून, एकतेची ताकद काय असते, हे संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. आम्ही महाराष्ट्राने आणि उत्तर प्रदेशने मोंदींचे बहुमत रोखले आहे. आमची बोलणी लवकरच सुरू होईल. आम्ही २५ तारखेलाच चर्चेसाठी बसणार होतो. मात्र, काँग्रेसची दिल्लीत काही महत्वाची बैठक आहे. यासाठी महाराष्ट्रतील सर्वच नेते दिल्लीला जाणार आहेत. यामुळे महाविकास आघाडीची २५ तारखेला होणारी बैठक आम्ही पुढे ढकलली आहे.
पवारांनी १० जागा लढल्या आणि ८ जिंकल्या, याचा अर्थ... -"आता विधानसभा आणि संसदेचे आधिवेश झाल्यानंत आम्ही पुन्हा बसू आणि चर्चा करू. कोण किती जागा लढवेल, हे कोण कुठे जिंकेल यावर अवलंबून आहे. यावेळी निश्चितच शरद पवारांचा स्ट्राइकरेट सर्वात जास्त आहे. पवारांनी १० जागा लढल्या आणि ८ जिंकल्या. याचा अर्थ असा नाही... शिवसेनेने ९ जागा जिंकल्या, पण शिवसेनेला सर्वात जास्त टार्गेट करण्यात आलं होतं," असेही राऊत म्हणाले.
मुंबईच्या एका जागेवर भाजप आणि शिंदे गटाने डाका टाकला -"आम्ही २१ जागा लढवल्या. त्यांपैकी ९ जिंकल्या. मुंबईच्या एका जागेवर भाजप आणि शिंदे गटाने डाका टाकला आहे. ती जागाही आम्ही जिंकलो होतो. दोन तीन जागा अशा आहेत जेथे आम्ही फार कमी फरकाने हारलो. त्यामुळे आमचाही स्ट्राइकरेट चांगला आहे. काँग्रेसचाही चांगला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात २८८ जागा आहेत. कुणाला काहीही कमी पडणार नाही. सर्वजण आरामात लढतील," असेही राऊत यांनी म्हटले आहे.
पुण्यात शरत पवारांनी पक्ष कार्यकर्त्यांसोबत घेतली बैठक -शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यात २ बैठका घेतल्या. पहिली बैठक पुणे शहर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांची होती तर दुसरी बैठक आमदार आणि नवनियुक्त खासदारांची होती. पीटीआयनुसार, पहिल्या बैठकीत सहभागी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष प्रशांत जगपात यांनी म्हटले होते की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यासोबत आघाडी टिकावी यासाठी पक्षाने कमी जागांवर निवडणूक लढवली. मात्र विधानसभेला चित्र वेगळे असेल. या बैठकीत, पुणे, बारामती, मावळ, शिरुर लोकसभेत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. यावेळी विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांनी बैठकीत संकेत दिल्याचे बोलले जाते.