राजाराम लोंढे, कोल्हापूरराष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये गेले दोन महिने सुरू असलेल्या पडझडीवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांत ‘सर्जरी’ करण्याचा प्रयत्न केला. नेत्यांनी आपल्या राजकीय सोयीसाठी केलेल्या आघाड्यांना मूक संमती देत नेत्यांची कानउपटणी केली, पण पक्षाच्या चौकटीत राहूनच काम करण्याचा कानमंत्रही देण्यास ते विसरले नाहीत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून कोल्हापूरकडे पाहिले जात होते. एकेकाळी पाच आमदार, दोन खासदारांसह जिल्ह्यातील प्रमुख सत्तास्थाने ताब्यात असणाऱ्या राष्ट्रवादीची दिवसेंदिवस प्रकृती खालावत चालली आहे. त्यात भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा मोठा धक्का राष्ट्रवादीला बसला. नगरपालिका निवडणुकांपासून पक्षातील दिग्गज भाजपामध्ये दाखल झाले आहेत. त्यात कमी की काय, म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्हा परिषदेसाठी थेट भाजपशी आघाडी केली. पक्षातील चारही नेत्यांची चार दिशेला तोंडे असल्याने कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. नेत्यांनी घेतलेल्या सोयीच्या भूमिकेचा अहवाल यापूर्वीच प्रदेश राष्ट्रवादीसह पवार यांच्याकडे गेलेला आहे. अशा परिस्थितीत पक्षाध्यक्ष पवार यांचा दौरा झाल्याने सर्वच राजकीय पक्षांचे याकडे लक्ष लागले होते. निवडणुकीच्या तोंडावर पवार यांचा दौरा म्हणजे काहीतरी उलथापालथ ठरलेली असते, पण या वेळी पवारांचा पक्षांतर्गत कुरघोड्या मिटवण्यातच वेळ गेल्याने इतर जोडण्या लावता आल्या नाहीत. पक्षाच्या विस्कटलेल्या घडीवर त्यांनी जाहीर कार्यक्रमातही बोट ठेवले. एका हॉस्पिटलच्या कार्यक्रमात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी उत्कृष्ट सर्जरी केल्याचे सांगत हसन मुश्रीफ व संजय मंडलिक यांना प्रकृतीकडे लक्ष द्या, धनंजय महाडिक यांच्यासारखे राहा, असा सल्ला देऊन पवार यांनी मुश्रीफ, महाडिकांचे कान उपटले. आघाड्यांच्या मांडवलीत गोंधळलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या चौकटीत राहून काम करण्याचा सल्लाही देण्यास ते विसरले नाहीत. शुक्रवारी रात्रीही त्यांनी जिल्ह्यातील काही ‘विश्वासू’ नेत्यांशी चर्चा करून शनिवारी सकाळी निवेदिता माने, संध्यादेवी कुपेकर, धनंजय महाडिक, के. पी. पाटील, हसन मुश्रीफ यांना बोलावून वादावर ‘सर्जरी’ केली. या सर्जरीचा ‘इफेक्ट’ लगेच दिसणार नसला तरी भविष्यात राष्ट्रवादीची जिल्ह्यातील घडी बसविण्यासाठी निश्चित उपयोगी ठरेल, अशी अपेक्षा निष्ठावंत कार्यकर्त्यांची आहे.
राष्ट्रवादीतील पडझडीवर शरद पवारांची ‘सर्जरी’
By admin | Published: January 30, 2017 12:30 AM