मुंबई : जानेवारी २०१८मध्ये पुण्यातील कोरेगाव भीमा येथे उसळलेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या चौकशी आयोगाने साक्ष नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना २३ व २४ फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. याआधी २०२०मध्येही पवार यांना साक्ष देण्यासाठी आयोगापुढे हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, कोरोनाच्या कारणास्तव पवार आयोगापुढे साक्ष नोंदवू शकले नाहीत.आयोगाने शरद पवार यांच्याशिवाय तत्कालीन पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) सुवेज हक, तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पाखळे आणि तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनाही २१ ते २५ फेब्रुवारीच्या दरम्यान साक्ष देण्यासाठी हजर राहण्यास सांगितले आहे. कोलकाता उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल व राज्याचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक हा द्विसदस्यीय आयोग या प्रकरणाची चौकशी करत आहे.पुणे पोलिसांच्या म्हणण्यानुसार, १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा द्विशताब्दी वर्धापन दिनादिवशी विजयस्तंभाजवळ दोन समूहांमध्ये जातीय दंगल उसळली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला, तर १० पोलीस जखमी झाले. ३१ जानेवारी २०१७ रोजी पुण्यातील शनिवारवाड्यात एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत झालेल्या चिथावणीखोर भाषणांमुळे कोरेगाव भीमा येथे जातीय दंगल उसळली. काय म्हणाले होते पवार...हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी कोरेगाव भीमा व आजूबाजूच्या परिसरात वेगळे वातावरण निर्माण केले. तसेच पुणे पोलीस आयुक्तांची भूमिका संशयास्पद असून, त्यासंदर्भात तपास करायला हवा, असे विधान पवार यांनी माध्यमांशी बोलताना केले होते. फेब्रुवारी २०२०मध्ये ‘विचार मंच’ या सामाजिक गटाने शरद पवार यांची साक्ष नोंदविण्यात यावी, यासाठी आयोगापुढे अर्ज केला आहे.
शरद पवार यांची कोरेगाव भीमा आयोगापुढे २३ फेब्रुवारीला साक्ष; संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्याही साक्षी नोंदविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 7:56 AM