पुणे : कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीचा तपासाबाबत नेमण्यात आलेल्या आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आयोगासमोर साक्ष देण्यासाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. ४ एप्रिल रोजी उपस्थित राहण्याचा आदेश या नोटीसव्दारे आयोगाने दिला आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत या तारखेत बदल होणार नाही अथवा पुढची तारीख मिळणार नसल्याचे या नोटीसमध्ये नमुद करण्यात आले आहे.पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेनंतर कोरेगाव भीमा येथे दंगल झाली होती. याप्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी नक्षलवाद्यांशी संबंध असणाऱ्या अनेकांना अटक केली आहे. यातील 9 जण सध्या अटकेत आहेत. दरम्यान शरद पवार यांनी या गुन्ह्याची पुन्हा एकदा चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने तडकाफडकी निर्णय घेत हा गुन्हा एनआयएकडे सोपवला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राजकीय क्षेत्रात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर शरद पवार यांना कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने चौकशीसाठी बोलवावे अशी मागणी केली होती. त्यानंतर आयोगाने पवार यांना हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे पवार चौकशी आयोगासमोर हजर राहणार का? आणि हजर राहिले तर काय साक्ष देणार ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
* कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीनंतर पवार यांनी आयोगासमोर एक प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात त्यांनी कुणाला जबाबदार धरले नव्हते. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी पवार यांंनी काही विधाने केली आहेत. या विधानातून त्यांनी काही आरोप केले आहेत. यामुळे कोरेगाव भीमाच्या दंगलीबाबत पवारांकडे सांगण्यासारखी माहिती असेल, किंवा पुरावे असतील हे त्यांनी सांगितल्यास रेकॉर्डवर येण्यास मदत होईल. म्हणून आयोगाकडे पवार यांनी आयोगापुढे हजर राहावे असे निवेदन दिले होते. आता पवारांकडे जी माहिती असेल ते रेकॉर्डवर येईल.यानिमित्ताने संबंधित प्रकरणातील सत्यता समोर येईल. यासाठी आयोगाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. -अ?ॅड. प्रदीप गावडे (याचिकाकर्ते)