पवारांची खरी राष्ट्रवादी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर; जयंत पाटलांचा अजित पवार गटावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 06:38 PM2023-12-01T18:38:39+5:302023-12-01T18:39:30+5:30
शेतकरी प्रश्नावरून जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर चौफेर टीका केली. तसंच अजित पवार गटावरही निशाणा साधला.
नाशिक : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाने राज्यभर आक्रमक भूमिका घेतली असून 'शेतकरी आक्रोश मोर्चा'चं आयोजन करण्यात येत आहे. आज दिंडोरी येथील आक्रोश मोर्चातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर चौफेर टीका केली. तसंच अजित पवार गटावरही जोरदार निशाणा साधला.
"आज आम्ही मोर्चा आणला, पण हा लढा इथेच थांबणार नाही. मी हा मुद्दा आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने येणाऱ्या हिवाळी अधिवेशनातही लावून धरणार. आपल्यातून तिकडे गेलेले पंचतारांकित हॉटेलमध्ये चिंतन करत आहेत. पण पवार साहेबांची खरी राष्ट्रवादी ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर आहे," असा हल्लाबोल जयंत पाटलांनी केला आहे. तसंच "जर तुम्ही विकासासाठी तिकडे गेले असाल तर या शेतकऱ्यांच्या मागे उभे राहा. राज्याची तिजोरी तुमच्या हातात आहे. पीकविमा तुमच्या हातात आहे, शेती खाते तुमच्या हातात आहे. मग मुख्यमंत्र्यांना आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना विचारण्याची काय गरज?" असा सवालही जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला केला आहे.
सरकारवर टीका करताना काय म्हणाले जयंत पाटील?
शेतकरी प्रश्नावरून सरकारचा समाचार घेताना जयंत पाटील म्हणाले की, "शेतकरी दारात आल्याशिवाय त्याला काहीच द्यायचे नाही हे सरकारचे धोरण आहे. म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून सतत मागणी केल्यानंतर फक्त राज्यातील काही भागात या सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे.आज सकाळी मी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत होतो. त्यावेळी शेतकरी कुऱ्हाडीने द्राक्षाची झाडे तोडत होता. तीन-साडे तीन लाख खर्च करून जर एक रुपयाही मिळणार नसेल तर काय फायदा, असे त्या शेतकऱ्याचे म्हणणे होते. ही या राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. या परिस्थितीत सरकारने पुढाकार घेतला पाहिजे," अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
धनंजय मुंडेंना टोला
"कांदा उत्पादक शेतकरी या भागाचा महत्त्वाचा घटक आहे. पण याच कांद्यावर या सरकारने ४० टक्के निर्यात शुल्क लावले आहे. कांदा बाहेर पाठवता येत नाही आणि त्यामुळे कांदा इथेच सडतो. पीकविमा कंपन्या काही कारणे सांगून परतावा देत नाही. महाराष्ट्रात फसव्या पीकविम्याचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे. पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही ही आपल्या राज्यासाठी शोकांतिका आहे. कृषिमंत्री म्हणाले होते की, दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळेल. शेतकऱ्यांना पैसे नाही मिळाले तर दिवाळी साजरी करणार नाही. यांची दिवाळी जोरात झाली पण आमच्या बळीराजाला पैसे मिळाले नाही. त्यामुळे या सरकारवर शेतकऱ्यांचा विश्वास राहिला नाही," अशा शब्दांत जयंत पाटील यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे.