“सावरकर समजून घ्यायचे असतील तर राहुल गांधींनी माझ्या व्याख्यानाला यावे”: शरद पोंक्षे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 02:40 PM2023-12-22T14:40:32+5:302023-12-22T14:40:51+5:30
Sharad Ponkshe Vs Rahul Gandhi: वीर सावरकरांबद्दल बोलायला उंची लागते, असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे.
Sharad Ponkshe Vs Rahul Gandhi ( Marathi News ): काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करत असतात. राहुल गांधी यांना टीकेवर प्रत्युत्तरही दिले जाते. यातच आता सावरकर समजून घ्यायचे असतील, तर राहुल गांधी यांनी माझ्या व्याख्यानाला यावे आणि सावरकर समजून घ्यावे, असे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले आहे.
मीडियाशी बोलताना शरद पोंक्षे म्हणाले की, नथुराम गोडसे या नाटकाचे १२०० पेक्षा अधिक प्रयोग झाले आहे. आता ५८ वर्षांचा झालो आहे. त्यामुळे कुठेतरी थांबले पाहिजे म्हणून २६ जानेवारी २०२४ ला नाथुराम गोडसे नाटकाचा शेवटचा प्रयोग करणार आहे. त्यानंतर या भूमिकेत दिसणार नाही, असे शरद पोंक्षे यांनी स्पष्ट केले. परंतु, यापुढे कोणी नाटक केले तर मला दिग्दर्शन करायला आवडेल. जो कोणी नाथुराम गोडसे करेल त्यांनी गोडसे समजून आणि अभ्यास करून ती भूमिका करावी, असे शरद पोंक्षे यांनी सांगितले.
व्याख्यानाला यावे आणि सावरकर समजून घ्यावे
शरद पोंक्षे यांनी यावेळी राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने सावरकरांवर केल्या जाणाऱ्या टीकेबाबत भाष्य केले. सावरकरांबद्दल बोलायला उंची लागते. ज्यांना सावरकर कळत नाही किंवा केवळ विरोध करायचा म्हणून राहुल गांधी सावरकरांबद्दल बेताल वक्तव्य करत असतात. कोणीतरी समजून सांगायला पाहिजे, नाहीतर माझ्या व्याख्यानाला यावे आणि सावरकर समजून घ्यावे. सावरकरांबाबत जेवढे बेताल व वादग्रस्त वक्तव्य कराल तेवढे सावरकर वाचले जातील, असे शरद पोंक्षे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आपण महापुरुषाची व्यक्ती म्हणून पूजा करता. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक महामानव आहेत. मात्र, आपण त्यांना देव बनवून पूजा करत असतो. त्यांची नकारात्मक बाजू दाखवली की मारामारी व हिंसा करतो. हे टाळले पाहिजे, असे पोंक्षे यांनी सांगितले.